सोलापूर - कोरेगाव भीमा दंगलीचा तपास एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) करणार असेल तर या पूर्वीच का केला नाही, असा सवाल उपस्थीत करून केंद्र सरकार राज्य सरकारवर कुरघोडी करत असल्याचा आरोप कामगार मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला.
दिलीप वळसे पाटील आज (शनिवारी) विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले. वेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना कोरेगाव भीमा तपास प्रकरणावरून केंद्र सरकारवर टीका केली.
हेही वाचा - शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी राजू शेट्टी यांचे विठ्ठलाला साकडे
तसेच पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी व्यापक बैठक घेण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. दिलीप वळसे पाटील यांनी आज पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले त्यानंतर त्यांचा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार भारत भालके यांनी पंढरपूर विकासाच्या अनुषंगाने मुद्दे मांडले. त्यानंतर पालकमंत्री वळसे-पाटील यांनी बैठक घेतली जाईल, असे सांगितले.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून आत्तापर्यंत झालेली कामे, आगामी करायची कामे याबाबत सर्वंकष चर्चा केली जाईल. पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यास जास्तीत-जास्त सुविधा देण्याच्या अनुषंगाने विचार केला जाईल, असे मंत्री वळसे पाटील यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रविण भोसले उपस्थित होते.
हेही वाचा - आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामगाराची आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या