सोलापूर - शहर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या काळातही सोलापूर शहर-जिल्ह्यातील खासगी रुग्णालय नागरिकांकडून लुटमारीचा धंदा करत आहेत. काही रुग्णालय चांगले आहेत मात्र, जे खासगी रुग्णालय लुटमारीचा धंदा करत आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही. लुटीचा तंत्र वापरत असाल तर रुग्णालयावर कारवाई करू, असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सोलापुरात दिला.
राज्यमंत्री बच्चू कडू हे पंढरपूर-मंगळवेढा पोट निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ सोमवारी (दि. 12 एप्रिल) सोलापूर दौऱ्यावर आले होते. शहरात एका खासगी मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार बच्चू कडू बोलत होते.
शेजारी असलेल्या हैदराबादमध्ये कोरोना वाढला नाही
आमदार बच्चू कडू म्हणाले, हैदराबादमध्ये गेलो असता त्या ठिकाणी साधा मास्कच कोणी वापरत नाही, तपासणीही होत नाही, व्यापार सुरू आहे, असे तेथील नागरिकांनी सांगितले. अशा ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी मात्र महाराष्ट्र राज्यात कोरोनाची चाचणी मोठ्या प्रमाणात होऊनही प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
शासकीय योजनेचा लाभ न देणाऱ्या रुग्णालयवर नजर
काही रुग्णालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजना देत नाहीत याकडे आमचे लक्ष आहे. सामान्य नागरिकांना जो कोणी ही योजना लागू करत नाही. त्यांच्यावरही कारवाई करू, असेही आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळावे, मास्क ,सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असेही आवाहन नागरिकांना केले आहे.
दूध का दूध पानी का पानी करणार
काही साखर कारखान्याचे देणे बाकी आहे. विडी कामगारांचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याकडे असंख्य खाते आहेत. त्यामुळे त्याचा केवळ आढावा नाही तर दूध का दूध, पानी का पानी केल्याशिवाय राहणार नाही, असेही आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.
जाणीवपूर्वक चूक केल्यास सोडणार नाही
नर्स , डॉक्टर, सफाई कामगार यांनी जाणीवपूर्वक चूक केल्यास सहन करणार नाही. जे कर्मचारी चांगले काम करत आहेत, त्यांना खांद्यावर घेऊन नाचू मात्र सर्वसामान्यांना पायदळी तुडवत असाल तर सोडणार नाही, असा इशाराही आमदार बच्चू कडू यांनी दिला.
केंद्राने पंढरपूरची पोटनिवडणूक लावण्याची गरज नव्हती
कोरोनाचा विळखा वाढत चाललेला आहे, अशा परिस्थितीत केंद्राने पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक लावायला नको होते. दोन-तीन महिने उशिरा घेतले असते तरी चालले असते. त्यामुळे अस्तित्व दाखवण्यासाठी याठिकाणी पक्षांमध्ये चढाओढ आहे, असेही आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.
सत्तेचा गैरवापर कसा करायचा आहे, भाजपकडून शिकावे
गुजरातमधील सुरत येथे भाजप कार्यालयात रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात आली. त्यावर आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला. सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे भाजपकडून शिकले पाहिजे.
सरकारने अ ब क ड पद्धतीने लागू करावी संचारबंदी
सरकारने संपूर्ण राज्यात संचारबंदी न करता ज्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्या ठिकाणी संचारबंदी करावी. अ, ब, क, ड अशा पद्धतीने अंमलबजावणी करून टाळेबंदी करणे अपेक्षित आहे.
हेही वाचा - भर पावसात जयंत पाटलांची सभा; साताऱ्याची पुनरावृत्ती पंढरपुरात होणार का?
हेही वाचा - वाढत्या कोरोना बरोबर चिकनचे दरही कडाडले, कोंबडी पालकांना अच्छे दिन