सोलापूर - परजिल्ह्यात व परराज्यात अडकलेल्या नागरिकांना आपापल्या राज्यात जाण्यासाठी शासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर जिल्ह्यातही याबाबतची तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून बाहेर जाणाऱ्या व्यक्तींची तसेच बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची माहिती संकलित करण्याची सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातून इतरत्र जाणारे आणि इतर ठिकाणाहून सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना आपल्या गावी आणण्यासाठी, नेण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यामुळे लाॅकडाऊनमुळे अडकलेले हे नागरिक लवकरच आपल्या गावी पोहोचणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाल्याने विविध राज्यात व जिल्ह्यात अनेक नागरिक अडकले आहेत. संचारबंदीमुळे सर्व उद्योग, काम, रोजंदारी बंद असल्याने मजूर, कामगारांच्या हाताला कामही नाही. त्यामुळे या नागरिकांची आर्थिक कोंडीही झाली आहे. वाहतूक सेवाही बंद असल्याने जाणेही कठीण झाले आहे. असे असले तरी प्रशासन त्यांची खाण्यापिण्याची सोय करत आहेत.
केंद्र शासनाने अडकलेल्या परराज्यातील, राज्यातील नागरिकांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी सशर्त मुंजूरी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परराज्यातील अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलन करुन त्यांची जाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने माहिती संकलन करण्यास सुरुवात केली आहे. संकलीत झालेली माहिती घेऊन ती प्रशासनाकडून ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहे. या माहितीमध्ये व्यक्तीचे नाव, किती जण जाणार, मोबाईल नंबर, कुठून कुठे जायचे ही माहिती भरुन घेतली जात आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यात अडकलेले तसेच जिल्ह्यातील परराज्यात अडकलेल्या नागरिकांना इच्छीत स्थळी पोहोचवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यातून पर जिल्ह्यात, पर राज्यात तसेच जिल्हा अंतर्गत एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात जाण्यासाठी व सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी अधिक माहितीसाठी नागरिकांनी 0217-2731007 किंवा 0217-2744616 या क्रमांकावर संपर्क करायचा आहे. त्याचबरोबर 1077 हे टोल फ्री क्रमांकही जारी करण्यात आला आहे. तर अर्ज भरण्यासाठी https://covid19.mhpolice.in या लिंकचा वापर करायचा आहे.
हेही वाचा - नियमानुसार धान्य वाटप करा; सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या सूचना