सोलापूर - शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोना संबंधित जास्तीत जास्त उपाय योजना करण्यासाठी राज्य सरकारने सोलापूर महापालिकेला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सोलापूरच्या महापौर श्रीकांचना यन्नम यांनी केली आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदन देऊन त्यांनी ही मागणी केली आहे.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर शहरात संचारबंदी लावावी का? याबाबत आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. यावेळी सोलापूरच्या महापौर श्रीकांचना यन्नम यांनी पालकमंत्री यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी महाराष्ट्र राज्य शासनाकडून कोविड-19 साठी जास्तीत जास्त निधी सोलापूर महानगरपालिकेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
सोलापूर शहर कामगारांचे शहर असून, याठिकाणी बिडी कामगार व यंत्रमाग कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सोलापूर महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. तरी देखील सोलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेचे आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. कोविड-19 उपाययोजना करण्यासाठी निधी कमी पडत आहे. तरी आपण महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून त्यासाठी महापालिकेला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करत असल्याचे महापौर यन्नम यांनी केली आहे.