सोलापूर - शहरातील शास्त्रीनगर येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. हाताला काम नाही, खिशात पैसा नाही मग अशा परिस्थितीत महागाईचा सामना करायचा कसा? असे म्हणत चक्क दुचाकी वाहनाची प्रतिकात्मक अंत्ययात्राच काढली.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आज (सोमवार) २९ जूनला आंदोलनाची हाक देण्यात आली होती. सोलापुरातही माकपचे माजी आमदार नरसय्या आडम आणि पक्षाचे जिल्हा सचिव अॕड.एम.एच.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून शास्त्रीनगर सेलच्यावतीने केंद्र सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण होत असताना देशात मात्र दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होत चालली आहे.
पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ ही महागाई वाढवणारी असून, लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. म्हणूनच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने हे आंदोलन पुकारण्यात आल्याचं सांगण्यात आले. या अंत्ययात्रेत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात सहभागी सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या सुचनेनुसार तोंडावर मास्क परिधान केले होते. तर सोशल डिस्टन्सिंगचे भानही ठेवण्यात आले होते. या आंदोलनात जावेद पठाण, शकील आगवाले, इब्राहीम मुल्ला, प्रकाश शेंडगे यांच्यासह इतर कार्यकर्ते सामील झाले होते.