सोलापूर- पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे सोलापूर मार्केट यार्डात शिस्तीत भाजीपाला मार्केट सुरू झाले. सोशल डिस्टन्सिंग पाळत किरकोळ व्यापाऱ्यांनी भाजीपाला खरेदी केला. मागील अनेक दिवसापासून बेशिस्तीचे दर्शन घडत असताना आज मार्केट यार्डात मोठी शिस्त पहायला मिळाली.
सोलापूरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे सोलापूरकर धास्तावले आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसल्याचे चित्र यापूर्वी दिसत होते. मागील काही दिवसातील अनूभव लक्षात घेता सोलापूर पोलिसांनी मार्केट यार्डात नियोजन केले. पोलिसांनी केलेल्या या नियोजनामुळे आज मार्केट यार्डात शिस्त पहायला मिळाली.
सहा दिवस सोलापूरात संपूर्ण संचार बंदी लागू करण्यात आली होती. मध्यंतरी एक दिवस काही तासासाठी सूट दिल्यानंतर सोलापूर शहरात लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे सोलापूर पोलिसांनी भाजी मार्केट सुरू करत असताना योग्य प्रकारे नियोजन केले. बुधवारी भाजी मार्केट सुरू झाले त्यावेळी पोलिसांनी केलेल्या नियोजनाचा फायदा झाल्याचे दिसून आले.
आज सकाळी भाजी मार्केटमध्ये शिस्तीत खरेदीदार भाजीपाला खरेदी करत असतानाचे चित्र पहायला मिळाले. बाजार समितीमध्ये छोटे छोटे व्यापारी भाजीपाला खरेदी करून शहरातील ग्राहकांना विक्री करतात. या छोट्या व्यापाऱ्यांनी बाजार समितीमध्ये शिस्तीत भाजीपाला खरेदी केला.