सोलापूर- मंगळवारी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखेच्यावतीने मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यात आला आहे. सोलापुरातील नाट्यप्रेमी तसेच कलाकारांच्या हस्ते सकाळी हुतात्मा स्मृती मंदिर येथे श्री नटराजाचे पूजन करण्यात आले.
दरवर्षी ५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. विष्णुदास भावे यांनी १८४३ साली 'सीता स्वयंवर' हे नाटक रंगभूमीवर सदर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला. या निमित्ताने ५ नोव्हेंबर रोजी नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष वि.दा.सावरकर हे होते. याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्थापण्यात आली. चिंतामणराव पटवर्धन यांनी दिलेल्या जागेवर विष्णुदास भावे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या नाट्यमंदिराची कोनशिला बसविण्यात आली होती. सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगली येथे समितीने ठराव करून हा दिवस जाहीर केला होता. तेव्हापासून राज्यभरात हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यात योतो.
सोलापुरातील नाट्यप्रेमी तसेच कलाकारांनी एकत्र येत रंगभूमी दिन साजरा केला. यावेळी नाट्य परिषदेच्या उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे, महानगरीय शाखेचे अध्यक्ष अजय दासरी, सल्लागार प्रशांत बडवे, रंगकर्मी शोभा बोल्ली, जयप्रकाश कुलकर्णी, निर्माते गुरु वठारे, प्रशांत शिंगे, कृष्णा हिरेमठ, ज्योतिबा काटे, मीरा शेंडगे, आशुतोष नाटकर, मुकुंद हिंगणे, नितेश फुलारी, सुशांत कुलकर्णी, श्रीपाद येरमाळकर, किरण लोंढे आदी नाट्य कलावंत उपस्थित होते.
कलावंत म्हणून किती मोठे आहोत यापेक्षाही आपण माणूस म्हणून किती मोठे आहोत हे जगायला नाटक शिकवते, असे ज्येष्ठ नाट्य कलावंत शोभा बोल्ली यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले आहे. याप्रसंगी नाट्य निर्मात्यांनी सोलापुरातून व्यवसायीक नाटकांना वाव मिळावा यासाठी आगामी काळात काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी नाट्यनिर्माते कलाकार मंडळी हुतात्मा स्मृति मंदिर येथील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.