सोलापूर (अकलूज) : Manoj Jarange Patil : मंडल कमिशनला ओबीसींची जनगणना करा, असे सांगण्यात आले होते. मात्र, मंडल कमिशनने तसे केले नसल्याचे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले. चार वर्षांमध्ये ओबीसींची 60 टक्के लोकसंख्या कशी वाढली? असा सवालही जरांगे पाटील यांनी केला. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र राहणे गरजेचे आहे. मराठ्यांनो भानावर या, तुमचे मतभेद बाजूला ठेवा, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी उपस्थित मराठा समाज बांधवांना केले. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 ऑक्टोबर ही आरक्षणाची अंतिम तारीख दिली असून, त्याला आता केवळ तीनच दिवस उरले आहेत.
त्यामुळे त्यांना लाल दिवा मिळाला : सत्तेसाठी वर्षानुवर्ष ज्यांचे पटत नव्हते ते लोक एकत्रित आले आणि त्यातून त्यांना लाल दिवा मिळाला, अशी टिप्पणीही जरांगे पाटील यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर केली. सरकारला आता आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आपण आता कोणीही मागे हटायचे नाही, असे आवाहन त्यांनी जाहीर सभेमध्ये बोलताना केले. फक्त तुमच्यामध्ये मतभेद होऊ देऊ नका, ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो. मराठा समाजाच्या पदरात आरक्षणाचं दान टाका, एवढीच विनंती तुम्हाला करण्यासाठी तुमच्या अकलूज शहरांमध्ये आलोय, असे भावनिक आवाहन जरांगे पाटील यांनी केले.
शांततेमध्ये आंदोलन करायचे आहे : या लढाईमध्ये माझा किंवा तुमचा कोणाचाही वैयक्तिक स्वार्थ नाही. इथे आपल्या जातीचा स्वार्थ आहे. आपल्या घराघरातील मराठ्यांच्या पोरांचा स्वार्थ आहे. म्हणून एकजुटीने सगळ्यांनी सावध राहा आणि आपली कसोटी लागली आहे. आपल्याला शांततेमध्ये आंदोलन करायचे आहे. पण, आरक्षण घेतल्याशिवाय हटायचे नाही. मीही एक इंचही मागे हटणार नाही, असा शब्द जरांगे पाटील यांनी अकलूजच्या सभेमध्ये मराठा समाज बांधवांना दिला.
हेही वाचा:
- Nitesh Rane : देवेंद्र फडणवीसांना फक्त ट्रेलर दाखवला... ; ड्रग्ज प्रकरणावरुन नितेश राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
- Lalit Patil Drug Case : ललित पाटील प्रकरणात संजय राऊत यांचे थेट लागेबांधे; संजय गायकवाडांचा गंभीर आरोप
- Ajit Pawar : 'कंत्राटी भरतीनं नोकऱ्या जाणार असल्याचा गैरसमज पसरवला, आता माफी...', अजित पवारांची टीका