सोलापूर - रस्त्यावरून फिरणाऱ्या महिलांवर नजर ठेवून, त्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज हिसकावून पळून जाणाऱ्या आरोपीस सदर बाजार पोलिसांनी 24 तासात अटक केले आहे. मंजुनाथ दीपक जाधव (25 वर्ष, रा.लिमयेवाडी जवळ, मंजुनाथ नगर, सोलापूर) असे त्या चोराचे नाव आहे. या संशयित आरोपीवर यापूर्वी धावत्या रेल्वेमध्ये दरोडा घातल्या प्रकरणी गुन्हे नोंद आहेत. तसेच याने सोलापूर शहरातील ज्या महिलेला चोरलेले सोन्याचे ऐवज विकले होते, तिलाही पोलिसांनी सह आरोपी म्हणून अटक केले आहे.
24 तासात चैन चोरणाऱ्याला अटक
16 जून रोजी सायंकाळी पावणे चारच्या सुमारास सात रस्ता येथून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर गंगाबाई चाबुकस्वार (57 वर्षे, रा. वीरप्पा नगर, ता. इंडी, जि विजापूर) या आपल्या चारचाकी वाहनात बसत होत्या. यावेळी चोर मंजुनाथ जाधव हा पाठीमागून आला आणि गंगाबाईंच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळून गेला. गंगाबाईंसोबत त्यांचा मुलगाही होता. त्याने चोराचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण मंजुनाथ जाधव हा पूढे पळत जाऊन एका दुचाकी वाहनावर बसून पळून गेला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. रेकॉर्डवरील चोर मंजुनाथ जाधव असल्याची खात्री करून घेतली. अखेर खबऱ्यांमार्फत त्याचा शोध घेऊन मंजुनाथच्या मुसक्या आवळल्या.
चैन चोराचे जोडीदार फरार
चैन चोर मंजुनाथ जाधवसोबत पवन उर्फ बबल्या दत्ता जाधव व सतीश दत्ता गायकवाड हे दोघे होते. या तिघांनी फिल्डिंग लावून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसका मारून लंपास केले होते. मुख्य संशयित आरोपी मंजुनाथ जाधव या दोघांच्या दुचाकीवर बसून पळून गेला होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पण पवन जाधव सतीश गायकवाड दोघे फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
चैन चोराकडून माल घेणाऱ्या महिलेला अटक
सदर बाजार पोलिसांनी मंजुनाथची कसून चौकशी केली. त्याने अनिसा रशीद शेख (रा. राहुल गांधी झोपडपट्टी, सोलापूर) हिला सोन्याचा ऐवज विकत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी ताबडतोब अनिसा शेख हिला ताब्यात घेऊन तिच्या घराची झडती घेतली. तिच्या घरात वेगवेगळ्या कंपनीचे स्मार्टफोन आणि मोबाइल असे 15 हँडसेट मिळून आले. तिला ताब्यात घेऊन सर्व मोबाइल फोनची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
1 लाख 21 हजाराचा मुद्देमाल हस्तगत
सदर बाजार गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी संशयित चैन चोर मंजुनाथ जाधव व अनिसा शेख यांकडून 1 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील, अश्विनी भोसले, एपीआय नंदकिशोर सोळंखी, इसाक नदाफ, खाजप्पा आरेनवरू, सागर सारतापे, कृष्णा बदूरे, नितीन गायकवाड, अमोल उगले, सचिन गुजरे, विठ्ठल काळजे, नवाज सय्यद, राहुल आवारे आदींनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.
हेही वाचा - तिसरी लाट : अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात अद्ययावत लहान मुलांचे कक्ष, 'इतके' बेड उपलब्ध