सोलापूर - राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे. अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सोलापूर येथे दिल्या. भरणे यांनी खरीप पीककर्ज वाटपाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक प्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. नियोजन भवनच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक अजय कडू ,जिल्हा उपनिबंधक अधिकारी कुंदन भोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने आदी उपस्थित होते.
खरीप पिकासाठी जास्त कर्ज वितरित केले जाणार
यावर्षी पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे पीक कर्जाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. ही शक्यता आणि कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करून खरीप पीक कर्जाचे जास्तीत जास्त वितरण होईल यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करावेत. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या मदतीची अथवा काही समस्या असल्यास त्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची मदत घ्यावी, असे भरणे यांनी सांगितले. जिल्हा उपनिबंधक अधिकारी कुंदन भोळे यांनी जिल्ह्यातील पीक कर्जाचे उद्दिष्ट आणि आतापर्यंत झालेले वितरण याबाबत माहिती दिली. बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक अजय कडू यांनी सर्व बँका पीक कर्जाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील. कोरोना कालावधीत बँकीग कामकाजावर परिणाम झाला होता. आता सुधारणा होईल, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा- कागल तालुक्यात अवकाळी पावसासह गारपिटीने नुकसान; 7 दिवसात पंचनामे करण्याचा सूचना : मुश्रीफ