सोलापूर (माढा) - माढ्यातील तहसील कार्यालयाचे नवीन इमारत बांधणीसाठी स्थलांतर होणार आहे. त्याचे स्थलांतर माढ्यातच करण्यात यावे, तालुक्यातील रस्त्याचे डांबरीकरण करावे, या मागण्यांसाठी स्थानिक काँग्रेस नेते दादासाहेब साठे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे निवेदन दिले.
काय आहेत मागण्या -
पंढरपुर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या प्रचार सभेसाठी नाना पटोले आले होते. त्यावेळी माजी आमदार धनाजी साठे व दादासाहेब साठे यांनी नाना पटोले यांची भेट घेऊन विविध मागण्या मांडल्या. माढा तहसील कार्यालयाची ब्रिटिशकालीन इमारत जीर्ण झाली आहे. राज्य सरकारने या इमारतीच्या ठिकाणी नवीन प्रशासकीय इमारतीला मंजुरी देऊन निधी देखील दिला आहे. माढा तहसील कार्यालयाची नविन प्रशासकीय इमारत होईपर्यंत तहसीलचा कारभार कुर्डूवाडीला नेण्यासाठी काही मंडळींचे प्रयत्न सुरू आहेत. याला माढ्यासह परिसरातील नागरिकांचा मोठा विरोध आहे. नवीन इमारत होईपर्यंत माढा शहरातील रयत शिक्षण संस्थेची इमारत, आश्रमशाळा किंवा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह या तिन्ही पैकी एका ठिकाणी तहसील कार्यालयाचे स्थलांतर करावे. तसेच माढा तालुक्यातील माढा ते पडसाळी, महातपूर ते वडशिंगे, दारफळ ते सुलतानपूर, महातपूर ते दारफळ, बिटरगाव ते रोपळे, अंजनगाव(उ)ते दारफळ, दारफळ ते जामगाव या खराब झालेल्या रस्त्यांची दुरूस्ती आणि डांबरीकरण करण्याची मागणी साठे यांनी केली आहे.
माजी आमदार धनाजी साठे यांचेही निवेदन -
श्री संत कुर्मदास कारखान्याच्या ऊस खरेदीदारांचे बिनव्याजी कर्जात रूपांतर करण्याबाबतचे निवेदन कारखान्याचे अध्यक्ष धनाजीराव साठे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिले आहे. साखर आयुक्तांकडे याबाबत प्रस्ताव दिला असून कारखान्याचा गाळप हंगाम सन २०१०-११ पासून सुरू झाला आहे. कारखान्याला २०१०-११, २०११-१२ व २०१२-१३ या तीन वर्षांसाठी गाळप केलेल्या ऊसावरील ऊस खरेदी कराची ४ कोटी १७ लाख ६३ हजार ९८३ रूपये या रक्कमेचे बिनव्याजी कर्जात रुपांतर करण्याची मागणी केली आहे. या प्रस्तावाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे निवेदनात म्हटले आहे.