सोलापूर - सोहाळे (ता. मोहोळ) येथे एका प्रेमीयुगुलाने प्रेमासाठी आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. सोहाळे येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये कालव्याच्या कडेला प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पूजा प्रवीण बचुटे-पाटील (वय 22, रा. नागज फाटा, सांगोला) व ज्ञानेश्वर रामचंद्र बचुटे (वय 21, रा. सोहाळे) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलांची नावे आहेत.
यातील पूजा बचुटे-पाटील हिचा नुकताच विवाह झाला होता. तर प्रियकर ज्ञानेश्वर बचुटे हा अविवाहित होता. दोघे चुलत बहीण-भाऊ असून, दोघांमध्ये पूर्वीपासून प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गेल्या दहा बारा दिवसांपूर्वी नवविवाहिता पूजा बचुटे-पाटील ही माहेरी सोहाळे येथे आली होती. पूजा व ज्ञानेश्वरने सोहाळे येथील कालव्याच्या कडेला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये एकाच दोरीला गळफास घेत आपले आयुष्य संपवले.
गेल्या आठवड्यात गुरुवारी 17 सप्टेंबर 2020 ला आपले प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल, या भीतीपोटी एका प्रेमीयुगुलाने नरखेड (ता. मोहोळ) येथे आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, रविवारी कामती पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखीन एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याच्या घटनेने मोहोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.
ज्ञानेश्वर व पूजा दोघेही भावकितील असल्याने नातेवाईकांचा या दोघांच्या प्रेमसंबंधाला विरोध होता. नात्याने भाऊ-बहीण आहेत असे अनेकांचे म्हणणे होते. परंतू प्रेमात वेडे झालेल्या या झोडप्याला समजावून सांगणार तरी कोण? घरच्यांनी या प्रेम प्रकरणाला विरोध करत पूजा बचुटे हीचा गेल्या महिन्यात एका युवकासोबत विवाह लावून दिला होता. या दोघा प्रेमीयुगुलांना विरह सहन न झाल्याने या दोघांनी टोकाचा निर्णय घेतला. पूजाने माहेरी येऊन प्रियकरासोबत एकाच दोरीला गळफास घेतला आहे. अश्रूंच्या ओघळत्या धारांसोबत या दोघांनी जीवन संपविले आहे.
हातावरील मेहंदी देखील गेली नव्हती अशा हाताने पूजा व ज्ञानेश्वरने गळफासाची दोरी बांधली. या घटनेची कामती पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक किरण उंदरे व पीएसआय नाईकवाडे करत आहेत.