पंढरपूर (सोलापूर) - थकवा घालवण्यासाठी सर्वजण विश्रांतीसाठी निसर्गरम्य ठिकाणाचा शोधात असतात. त्याचप्रमाणे पंढरपुरचा विठुरायाच्या पंढरीतील आपले मंदिर सोडून महिन्याभराच्या सुटीवर असतो. मागील शेकडो वर्षांपासून विठूराया दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात चंद्रभागेतील विष्णूपद मंदिरात वास्तव्यास असतो, अशी आख्यायिका आहे.
चंद्रभागा नदी पात्रातील विष्णूपद मंदिराचा इतिहास
पंढरपूरपासून जवळच असलेल्या गोपाळपूरजवळ चंद्रभागेच्या पात्रात एक पुरातन मंदिर आहे. या मंदिरास विष्णूपद म्हणून ओळखले जाते. यामागे पद्म पुराणात अख्यायिका सांगितली जाते. जेव्हा रुक्मिणी देवी देवावर रुसून दिंडीर वनात आली. तेव्हा देवीच्या शोधात विठ्ठल ज्या ठिकाणी पंढरपुरात प्रथम आले, ते ठिकाण म्हणजे चंद्रभागेच्या पात्रातील मोठा खडक म्हणजेच विष्णूपद. या ठिकाणी एका मोठ्या शिळेवर मध्यभागी देवाचे समचरण आणि देहूडाचरण म्हणजेच पाऊले उमटलेली आहेत. त्यासोबत काठी ठेवल्याची आणि काल्याच्या वाडग्याची खूण आहे. या शिळेवर दगडी मंडप उभारला आहे. येथील खांबावर चतुर्भुज समचरण विष्णूमूर्ती आणि देहूडाचरण मुरलीधराची मूर्ती कोरली आहे. विठ्ठल हे विष्णूचे अवतार असल्याने इथे उमटलेल्या पावलांमुळे या चंद्रभागेच्या पाण्यातील खडकावरील ठिकाणास विष्णूपद, असे नाव मिळाले.
विठुरायाची नित्यपूजा विष्णूपद मंदिरात
मार्गशीर्ष महिन्यात देव या ठिकाणी राहायला येतात, असे मानले जाते. विष्णूपद येथे विठूरायाची पूजा मार्गशीर्ष महिन्यामध्ये पंढरपूर येथील विठुराया मंदिरात न राहता पंढरपूर येथून तीन किलोमीटर अंतरावर असणारे विष्णूपद या ठिकाणी असतो, अशी आख्यायिका आहे. विठुराया मंदिरातून विष्णूपदावर आल्याने पंढरपुरातील मंदिरात होणारी नित्यपूजा, धुपारती, शेजारती, सकाळच्या खिचडीचा, दुपारचा महानैवेद्य आणि रात्रीचा बालभोग नैवेद्य याच ठिकाणी दाखविले जातात.
विष्णूपदाला येणाऱ्यांची संख्या घटली
अनेक भाविक नौकानयनाचा आनंद घेत विष्णूपदावर येतात. पंढरपूरकर भाविक डबे घेऊन या ठिकाणी येतात. दर्शन केल्यानंतर वनभोजनाचा आनंद लुटतात. मार्गशीर्षमध्ये पंढरपुरात वारीला आलेल्या वारकरी दिंड्याही बारस सोडायला या ठिकाणी येतात. मात्र, कोरोनामुळे विष्णूपदाला येणाऱ्या भाविकांची संख्याही कमी होत आहे.
हेही वाचा - मोक्षदा एकादशीला भाविक 'बा विठ्ठला'च्या भेटीला; मात्र, कोरोनाच्या नियमांचे पालन नाहीच...
हेही वाचा - पंढरपूर; विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील भंग पावलेल्या मूर्तींची नव्याने प्राणप्रतिष्ठाना