पंढरपूर - शहरात मंगळवारी कोरोनाचे 34 नवे रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 619 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 11 आहे. पंढरीत मंगळवारपर्यंत 273 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. पंढरीत रुग्ण बरे होण्याचा दर 52 टक्क्यांवर असून, तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 12 ते 13 दिवसांवर आहे.
पंढरपूर शहरातील कोरोना प्रसार रोखण्यासाठी पूर्ण संचारबंदी केली जावी, अशी मागणी होत होती यानुसार 7 ते 13 ऑगस्ट या कालावधीत संचारबंदी (लॉकडाऊन) लागू करण्यात येत आहे. 6 ऑगस्ट मध्यरात्री पासून ही संचारबंदी लागू होणार आहे. ही संचारबंदी 7 दिवसांची असणार आहे.
संचारबंदीच्या कालावधीत पंढरपूर शहरातील मंदीर परिसर, प्रदक्षिणा मार्ग या परिसरात व्यापक प्रमाणावर रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात येणार आहेत. सात दिवसात कोरोना संसर्ग रोखण्यात कितपत यश येते, याचा आढावा घेवून संचारबंदीबाबत पुढील निर्णय घेतला जाईल.
पंढरपूर येथे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे. पंढरपूर वगळता जिल्ह्यात इतरत्र लग्नसमारंभ, अंत्यविधी आदीसाठी नियमांचे काटेकोर पालन करण्याची विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे