पंढरपूर (सोलापूर) - तालुक्यात व शहरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू असलेली संचारबंदी 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने शहरासह आसपासच्या काही गावात 7 ऑगस्टपासून संचारबंदी लागू केली होती. अगोदर 13 ऑगस्टपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार होती. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.
एक दिवसात मोठ्या प्रमाणात रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येणार आहेत. हे काम करणाऱ्या पथकांना सहकार्य करा. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. आपली टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास आपल्यावर इलाज करणे सोयीस्कर होणार आहे. टाळाटाळ करू नका, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
संचारबंदी काळात पंढरपूर शहर आणि तालुक्यात प्रशासनाकडून 3500 रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यात 600 पेक्षा जास्त अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पंढरीत सध्या 813 कोरोना रुग्णांवर उपचार चालू आहेत. शहर आणि तालुक्यातील काही भागात रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यासाठी एक दिवसाचा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. कोणतीही अडचण निर्माण झाल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क करा, घाबरू नका, पण जागरूक रहा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.