सोलापूर : जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवरबार्शी शहर व तालुक्यात 31जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येईल, अशी माहिती सोलापुरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. तसेच यापूढे सोलापुरात संचारबंदी लागू केली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
सोलापूर शहरात यापुढे संचारबंदी लागू केली जाणार नाही. मात्र, बार्शी शहर आणि तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता तिथे येत्या 31 जुलैपर्यंत संचारबंदी लागू केली जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज(रविवार) जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी ही बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीला सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, मोहोळचे आमदार यशवंत माने, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर आदी उपस्थित होते.
बैठकीत लॉकडाऊनच्या कालावधीत करण्यात आलेल्या चाचण्या आणि त्यातुन निष्पण्ण् झालेले कोरोनाबाधित रुग्ण, त्यांच्यावर केले जाणारे उपचार, कायदा आणि सुव्यवस्था स्थिती, कोरोनासाठी आवश्यक असणारा निधी याबाबत सविस्तर चर्चा झाली. यामध्ये, ‘कोरोना चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे उपचाराची क्षमताही वाढवावी लागणार आहे. त्यासाठी डेडिकेटेड कोविड सेंटर, कोविड हॉस्पिटल यांची संख्या वाढवावी लागेल. यासाठी राज्य शासनाकडून निधी मागणीचा प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे. हा प्रस्ताव महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने तत्काळ सादर करावा’ असे पालकमंत्र्यांनी सांगितले आहे.
‘लॉकडाऊनच्या कालावधीत शहर आणि जिल्ह्यात सुमारे वीस हजार रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये 1584 कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे आढळले. या लोकांचे अलगीकरण करुन उपचार सुरू करण्यात आले. टेस्टींगची वाढवलेली क्षमता लक्षात घेऊन उपचाराची क्षमताही वाढविण्यासाठी प्रयत्न केले गेले. शहर, जिल्ह्यातील क्वारंटाईन सेंटरची क्षमता वाढविण्यात आली असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले. गंभीर रुग्णांवर नामवंत डॉक्टरांकडून उपचार करता यावे यासाठी टेलि-आयसीयु प्रणाली सुरू करण्यात आली आहे. यामुळे सोलापुरमधील गंभीर रुग्णांवर उपचारासाठी मुंबई, पुणे येथील डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतो. यासाठी आवश्यक असणाऱ्या हायस्पीड डेटा लाईनची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
या बैठकीत पोलीस उपायुक्त बापू बांगर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, डॉ.प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संतोष शेलार, कार्यकारी अभियंता संभाजी धोत्रे आदी उपस्थित होते.