सोलापूर- राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी मंद्रुप-कंदलगाव महामार्गावर कारावाई करत मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त केला आहे. कारवाईत गोवा निर्मित दारूच्या बाटल्या आणि दोन चार चाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. ८ लाख ८४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
लॉकडाऊन आणि त्यानंतर सोलापूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत व सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक पोलिसच अवैध दारू धंद्यावर कारवाई करत होते. राज्य उत्पादन शुल्क गाफीलच असल्यासारखे चित्र निर्माण झाले होते. दरम्यान, आज दुपारी दुय्यम निरीक्षक (ब विभाग) यांच्या पथकाला मंद्रुप-कंदलगाव मार्गावर दोन टोयोटा कार (एम.एच १२ के.एन ९७०९) व (एम.एच २५ आर २७८१) गोवा निर्मित दारूच्या बाटल्या तस्करी करताना आढळल्या. या दोन्ही कारमध्ये एकूण २५ बॉक्स दारूच्या बाटल्या होत्या. पथकाने या सर्व मालासह तस्करीसाठी वापरण्यात आलेले दोन चारचाकी वाहन जप्त केले असून, शरणबसप्पा कुंडलिक बिराजदार (वय ३४ वर्ष, निमगाव, ता अक्कलकोट, जि सोलापूर), अशोक रमेश ताठे (वय २४ वर्ष, रा,उल्हासनगर, ता अक्कलकोट, जि सोलापूर), उस्मानाबाद येथील सराईत मद्य तस्कर मुन्ना खुने व रोहित खुने या सर्व संशयित आरोपींना अटक केली आहे.
दरम्यान, ५ वा आरोपी दिनानाथ तिवारी फरार आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकातील प्रभारी निरीक्षक किरण बिराजदार, सी.के. वाघमारे, उपनिरीक्षक गोणारकर, संकपाळ, दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, जवान अण्णा कंचे, आदींनी केली आहे.
हेही वाचा-ताटकळेल्या सोलापूरकरांसाठी खुशखबर, 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार सोलापूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस