उस्मानाबाद - सोलापूर आणि उस्मानाबाद ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जम्बो हातबट्टी नष्ट केली. सोलापूर जिल्ह्यातील वैराग पोलीस ठाण्याच्या सामाईक हद्दीत असलेल्या अवैध हातभट्टीवर कारवाई करण्यात आली.
वैराग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भातंब्रा शिवारातील यमाई तांडा येथे मोठ्या प्रमाणात अवैध हातभट्टी दारु निर्मिती होत असल्याची मिळाली होती. ही दारू दोन्ही जिल्ह्यातील सिमा भागांत वितरीत केली जात असल्याची गोपनीय खबर वैराग पोलिसांना आणि उस्मानाबाद पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर दोन्ही हद्दीतील पोलिसांनी संयुक्त पथक तयार करून बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान यमाई तांडा येथे छापा टाकला.
यावेळी तेथे अवैध गावठी दारू निर्मितीची एक जम्बो हातभट्टी आढळली. त्यात प्रत्येकी 200 लि. क्षमतेच्या 4 पिंपांना एकत्र जोडून द्रव पदार्थ उकळून (डिस्टीलेशन) या हातभट्टीत दारू निर्मिती केली जात असल्याचे आढळले. तसेच अवैध गावठी दारू निर्मितीसाठी लागणारा द्रव पदार्थ आंबवण्यासाठी जमिनीत एक हौद बनवलेला होता. यासोबत 40 पंपात द्रव पदार्थ साठवलेला आढळला. त्यानंतर पोलिसांनी हा आंबवलेला द्रव पदार्थ जागेवर ओतून नष्ट केला. याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.