सोलापूर - कोणार्क एक्सप्रेस ही रेल्वे कर्डुवाडी-पुणे या रेल्वेमार्गावर क्रॉसिंगसाठी पारेवाडी या रेल्वे स्थानकावर थांबली होती. त्यावेळी गाडीतील खानपान गृहातील कर्मचारी आणि रेल्वे पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे रेल्वे तब्बलअर्धा तास रोखून धरावी लागली. रेल्वेची चैन ओढण्याच्या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये मात्र घबराट निर्माण झाली होती.
हेही वाचा - धक्कादायक! संपत्तीच्या वादातून मुलीने केला जन्मदात्याचा खून
बुधवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान भुवनेश्वरहून मुंबईकडे जाणारी कोणार्क एक्स्प्रेस (गाडी नं ११०२०) सिकंदराबाद-पुणे (गाडी नं १२०२६) ही गाडी पुढे जात असल्याने पारेवाडी स्थानकावर थांबवण्यात आली होती. यावेळी गाडीतील खानपान गृहातील कर्मचारी व पारेवाडी स्थानकातील रेल्वे पोलीस यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. यामुळे स्थानकावर काही वेळ तणावाचे वातावरण होते. तर प्रवासी गोंधळून गेले. याच वेळी गाडीला पुढे जाण्यासाठी सिग्नल दिला, पण साखळी ओढल्याने गाडी पुढे जात नव्हती. त्यामुळे आणखी गोंधळ वाढला. नंतर अर्ध्यातासाने गाडी पुढे मार्गस्थ झाली. रात्रीच्या वेळीच हा प्रसंग झाल्याने प्रवाशामध्ये घबराट निर्माण झाली होती. एकूणच या झालेल्या प्रकाराबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - कृत्रिम पंजा बसवलेले 'साहेबराव' लवकरच शिकारीसाठी होणार सज्ज