सोलापूर : खिलार जाती मधील कोसा खिलार जातीचा सोन्या बैल फक्त साडेचार वर्षांचा आहे. महिन्याला दोन ते अडीच लाखांचं उत्पन्न सोन्यापासून मिळत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील विविध कृषी प्रदर्शनात सोन्यानं प्रथम क्रमांक पटकावला आहे. दररोज दूध अंडी, दहा प्रकारचं कडधान्य असा खुराक खिलार सोन्याचा आहे. एका हौशी शेतकऱ्यानं याची चाळीस लाखांत मागणी केली होती. मात्र कोट्यवधी रुपये जरी किंमत आली तरी सोन्याला विकणार नसल्याची माहिती बैल मालकानं दिली आहे. सोलापूरच्या कृषी प्रदर्शनात देखील त्यानं प्रथम पदक पटकावलं आहे.
आज त्याच्यामुळे आमची ओळख : विद्यानंद आवटी यां शेतकऱ्यानं सोलापुरातील एका जनावर बाजारातून साडेतीन लाखाला खिलार जातीचं वासरू विकत घेतलं होतं. बोळकवठे गावातील बाजारातून अडीच वर्षांचा असताना त्याला घरी आणलं आणि अगोदर त्याचं नामकरण करत त्याचं नाव सोन्या ठेवलं. बाजारातून विकत घेताना सोन्या सर्वसाधारण खिलार वासरू(वळू) प्रमाणं होता. दोन वर्षांत सोन्याला उत्तम प्रतीचा खुराक देऊन त्याचा सांभाळ केला. बैल वर्गीय प्राण्यांमधील खिलार जातच अशी आहे, जी उंच डौलदार असते. फक्त त्यावर खुराकासाठी खर्च करणं गरजेचं असल्याची माहिती आवटी यांनी दिली. दोन वर्षांत सोन्यानं तीन कृषी प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन राज्यात 'सोन्या'सारखा बैल नाही, त्याच्यामुळं आमची ओळख झाली आहे. अशी भावनिक माहिती शेतकऱ्यानं दिली.
घरातील सदस्यांप्रमाणं त्याचा सांभाळ : विद्यानंद आवटी या शेतकऱ्यानं सांगितलं, "सोन्याला आम्ही आमच्या घरातील सदस्य समजतो. एका दिवसासाठी देखील त्यापासून दूर राहू शकत नाही. संपूर्ण कुटुंबाला याचा लळा लागला आहे. माझे वडील आणि आम्ही भावंडानी शपथ घेतली आहे, सोन्या कधीच शेतीत जुंपणार नाही. सोन्याच्या खांद्यावरील कमाई आम्ही खाणारच नाही. त्याच्या ब्रिडिंग मधून महिन्याला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे."
हेही वाचा :