करमाळा(सोलापूर) - नक्षली, दुर्गम भागात केलेल्या कार्यामुळे करमाळ्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी ( DYSP ) डॉ. विशाल हिरे यांना केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे आंतरिक सुरक्षा पदक जाहीर झाले आहे. हे पदक मिळाल्याने त्यांनी केलेल्या कार्याचे कौतूक होत आहे. दुर्गम व नक्षली भागात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल त्यांना हे पदक जाहीर झाले आहे.
डॉ. विशाल हिरे हे सध्या करमाळा येथे पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील दाभाडी या गावचे ते सुपूत्र असून, सन 2014 च्या बॅचचे अधिकारी आहेत. डॉ. विशाल हिरे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात प्रोबेशन पिरियड पूर्ण केल्यानंतर त्यांची नेमणूक चंद्रपूर जिल्ह्यात मूळ उपविभाग याठिकाणी झाली. नक्षलप्रबंध प्रभाग म्हणून माझी पहिली पोस्टिंग झाली. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी भाग आहे. नक्षल मूव्हमेंटमुळे आदिवासी यांच्यामध्ये शासनाबद्दल एक चांगली भूमिका निर्माण व्हावी या अनुषंगाने पोलीस विभागामार्फत जनजागरण मेळावे, मेडिकल कॅम्प घेतला. त्यामध्ये आदिवासी समाजासह इतर समाजातील पाच हजार लोकांनी लाभ घेतला. या कामामुळे बराचसा फायदा झाला. त्यात शासनाच्या माध्यमातून 150 लोकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या. त्यामुळे आदिवासी समाजातील व इतर समाजातील जो दुर्गम भाग आहे, त्याच्यामध्ये प्रशासनाबद्दल चांगली भावना निर्माण झाली होती हिरे यांनी सांगितले.
2016 ते 2018 या दोन ते अडीच वर्षाचा काळ तेथे मी होतो. त्या कालावधीत शासनाबद्दल चांगली भावना निर्माण व्हावी म्हणून मी प्रयत्न केले. कदाचित त्याच कामाची पावती म्हणून मला केंद्रीय आंतरिक सुरक्षा पदक घोषित केले आहे, अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी दिली.