सोलापूर - देशातील नागरी बँका आणि सहकारी बँकावर रिझर्व्ह बँकेने काही निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध कमी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत बैठक सुरू आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोलापुरात दिली. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यात बैठक झाल्यानंतर अनेक चर्चा सुरू होत्या. परंतु जयंत पाटील यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सोलापूर शहरातील हेरिटेज मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा व पक्ष प्रवेश आयोजित करण्यात आला होता. यावेळी मेळाव्यानंतर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली.
दिल्लीत बैठक; चर्चा राज्यात -
माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज शनिवारी सकाळी पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. लोकसभेचे पावसाळी अधिवेशन आणि नव्या सहकार खात्याची निर्मिती या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत होती. नव्याने निर्माण करण्यात आलेले सहकार खाते, महाराष्ट्रातील आणि देशातील सहकाराचे प्रश्न, सहकार खात्याकडून असलेल्या अपेक्षा आणि बँकिंग संदर्भातील विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले होते. दिल्लीत झालेल्या याबैठकी मुळे महाराष्ट्र राज्यातील राजकारणात एकच चर्चा सुरू झाली होती.
सहकारी बँकावरील निर्बंध कमी होणार का? -
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये बैठक झाली. बैठकीत सहकारी बँकाबाबत चर्चा झाली आहे. सहकारी बँकावर रिझर्व्ह बॅंकेने मोठे निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध कमी करण्यासाठी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बैठक झाली, असे जयंत पाटील यांनी सांगितले.