सोलापूर - मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदरच्या भीमा सहकारी साखर कारखाना कामगारांचा थकीत पगार, सेवानिवृत्त कामगारांची देणी आणि शेतकऱ्यांच्या गाळप झालेल्या उसाची एफआरपीची रक्कम त्वरित त्यांच्या खात्यात जमा करावी, या मागण्यांसाठी आज (गुरूवार) जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
संघटनेचे अध्यक्ष आणि भीमा कारखान्याचे संचालक प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज कारखाना गेटसमोर दिवसभर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. दरम्यान, कारखान्याचे उपाध्यक्ष सतिश जगताप यांनी काही संचालकांसह आंदोलनस्थळी भेट देऊन देशमुख यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, देशमुख यांनी थकीत रक्कम जमा होईपर्यंत हा लढा चालूच राहील, असे ठणकावून सांगितले.
हेही वाचा - सोलापुरात परतीच्या पावसाची जोरदार बॅटींग
त्यामुळे कारखाना प्रशासनाची कोंडी झाली आहे. भीमा सहकारी साखर कारखाना सध्या आर्थिक अडचणीत आला आहे. त्यामुळे सेवानिवृत्त कामगारांची देय रक्कम, कायम कामगारांचा पगार एप्रिल २०१८ पासून २ महिने वगळता थकीत आहे. तर सन २०१७-१८ च्या गळीत हंगामातील काही शेतकऱ्यांचे १५० रुपये व चालु २०१८-१९ मधील एफआरपी पैकी काही रक्कम थकीत आहे. कामगारांचे पगार थकल्याने कामगार प्रचंड अडचणीत आले आहेत. सर्व उलाढाली, व्यवहार ठप्प झाले आहेत. लग्नकार्य, शैक्षणिक प्रवेश, शेतीची कामे पैशांअभावी अक्षरशः रखडली आहेत. या सर्व मागण्यांसाठी आपण कामगार व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनाचा निर्णय घेतला असल्याचे प्रभाकर देशमुख यावेळी बोलताना म्हणाले.
हेही वाचा - राष्ट्रवादी काँग्रेसचे मूक आंदोलन ; शरद पवारांवर दाखल केलेल्या गुन्ह्याचा निषेध