सोलापूर - मोठा भाऊ सतत अपमान करत होता, कधी-कधी मारहाणही करत होता, त्यामुळे चिडून लहान भावाने मोठ्या भावाचा काटाच काढला. यामध्ये रोहित मारुती बनसोडे (वय 26 वर्षे, रा. तक्षशिल नगर, कुमठा नाका, सोलापूर) याचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी राकेश मारुती बनसोडे (वय 21 वर्षे, रा. तक्षशिल नगर, कुमठा नाका, सोलापूर), याला सदर बझार पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना सोमवारी (दि. 5 ऑक्टोबर) पहाटेच्या सुमारास घडली आहे. रोहित बनसोडे हा त्याचा लहान भाऊ राकेश याला नेहमी मारत होता व अपमान करत होता. सोमवारी मध्यरात्री दोघा भावामध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. राकेशने घरात ठेवलेला 20 किलो वजनाच्या डंबेल्सने रोहितच्या डोक्यात घाव घातला यामध्ये रोहितचा जीव गेला. रक्ताच्या थारोळात रोहित निपचित पडला. राकेशने घटनास्थळावरून पळ काढला. सोमवारी पहाटे च्या सुमारास तो सायकलवरून जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरत होता. त्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी राकेशला अडवून त्याची विचारपूर केली असता त्याने मोठ्या भावाचा खून केल्याची कबुली दिली. सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून झाल्याने त्याला त्या पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले. याबाबत अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी माहिती दिली.
राकेश हा चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांना हवा होता
राकेश बनसोडे हा किरकोळ चोऱ्या देखील करत होता. सदर बझार पोलिसांनी राकेशला यापूर्वी अटक देखील केले होते. आणखी दोन दुकानफोडीमध्ये पोलीस त्याचा शोध घेत होते. हे सर्व काम सोड आणि कुठे तरी प्रमाणिक काम कर, असे त्याचा मोठा भाऊ रोहित बनसोडे त्याला समजावून सांगत होता. पण, तो ऐकत नसल्याने तो त्याला वेळप्रसंगी मारहाण देखील करत होता. मोठ्या भावाच्या सततच्या किरकिरीमुळे त्याला ठार केले. या दोघांचे आई-वडील पोटाची खळगी भरण्यासाठी पुणे येथे गेले आहेत. तीन बहिणी असून तिघींचे लग्न झाले आहेत. राकेश बनसोडे व रोहित बनसोडे दोघेही अविवाहित आहेत.
हेही वाचा - बजाज फायनान्सची गुंडगिरी; थकीत कर्जदारास बेल्टने मारहाण