सोलापूर - भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी तेजस्विनी सातपुते यांची जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची अहमदनगरला बदली झाली आहे. त्यांच्या जागा आता साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते हे घेतील. त्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या महिल्या ठरल्या आहेत.
गेल्या आठवड्यापासून प्रभारी अधीक्षक म्हणून अतुल झेंडे काम पाहत होते. गृह विभागाने (बुधवारी) चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. शुक्रवारपर्यंत सातपुते आपल्या अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारतील.
भारतीय पोलीस सेवेतील अशोक दुधे यांची बदली होऊनही त्यांना पदभार मिळालेला नव्हता. त्यांची रायगडच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर तेजस्वी सातपुते यांच्या बदलीनंतर अजयकुमार बन्सल यांची साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगावचे प्रभारी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांची बदली झाली आहे. त्यांना त्याच ठिकाणी सहायक पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली आहे. तर रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आणि जळगावचे सहायक पोलीस अधीक्षक निलभ रोहन यांचीही बदली करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या पदस्थापनेबाबत स्वतंत्र आदेश काढले जातील, असेही गृह विभागाने आदेशात म्हटले आहे.
पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती विचारात घेऊन बदलीच्या ठिकाणी तत्काळ हजर राहावे. तत्पूर्वी, त्यांचा मूळ पदभार सोडावा आणि त्याचा अहवाल शासनाला सादर करावा, असेही आदेश गृह विभागाने दिले आहेत.
तेजस्विनी सातपुते या 2012 बॅचच्या भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी पुणे येथे वाहतूक शाखेच्या प्रमुख (DCP) पदाची जबाबदारी मोठ्या कौशल्याने हाताळली होती. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी हे त्यांचे मूळ गाव आहे. बायोटेक्नॉलॉजी आणि लॉमध्ये सातपुते यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे. सातपुते यांच्या सोलापूर पोलीस अधीक्षकपदी नियुक्तीने अनेक वाळू माफिया आणि अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे.