सोलापूर - नावीन्यपूर्ण प्रयोग म्हणून सोलापुरात स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. विशेष म्हणजे या लागवडीतून भरघोस उत्पन्नदेखील मिळत आहे. ही शेती किंवा स्ट्रॉबेरीची लागवड माळरानावर केली आहे. तसा सोलापूर जिल्हा उसाच्या लागवडीसाठी आणि ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. पण माळरानावर स्ट्रॉबेरीचा प्रयोग यशस्वी झाला असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक प्रकारे उत्तम आणि नवीन उदाहरण समोर आले आहे.
वडाळा माळरानाची जमीन खडकाळ आहे. खडकाळ किंवा जिरायत जमिनीत ज्वारी, सीताफळ किंवा पाण्याची व्यवस्था करून उसाची लागवड करावयाची अशी मानसिकता सोलापूरकरांच्यात आहे. मात्र, वडाळा येथील लोकमंगल कृषी महाविद्यालयाने पारंपरिक शेतीला बगल देत स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. यामधून भरघोस उत्पन्न मिळत आहे.
महाबळेश्वर येथून रोपे मागवली
लोकमंगल कृषी महाविद्यालयाने स्ट्रॉबेरीची पाच हजार रोपे महाबळेश्वर येथून मागविली. साधारण ऑक्टोबर 2020 च्या पहिल्या पंधरवड्यात याची लागवड केली. विंटर डाऊन या जातीची स्ट्रॉबेरी उत्पादन करण्याचा प्रकल्प हाती घेऊन याची शेती करण्यास सुरुवात केली. थंडीच्या वातावरणात याची लागवड केली जाते. याचा सर्व सखोल अभ्यास करून ऑक्टोबर 2020 पासून शेतीस सुरुवात केली.
हेही वाचा - शेतकऱ्याने माळरानावर फुलवली जरबेराची फुलशेती; मिळते भरघोस उत्पन्न
प्लास्टिकच्या आच्छादनाची लागवड
माळरानावर 11 गुंठे जमीन निवडण्यात आली आणि विंटर डाऊन स्ट्रॉबेरीची लागवड केली. एक ते दोन मजूर या कामासाठी लावून ठिबक सिंचन पध्दतीने याला पाणीपुरवठा केला. ऑक्टोबरमध्ये लागवड केलेल्या स्ट्रॉबेरीच्या रोपांना जानेवारी 2021 मध्ये फळे आली. साधारण 200 ते 250 किलोपर्यंत फळे लागली होती. आणि 300 ते 400 रुपयांपर्यंत प्रति किलो या दराने ग्राहकांना विक्री केली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना या नव्या प्रयोगाची माहिती मिळताच त्यांनी ही शेती पाहण्यासाठी एकच गर्दी केली.
सोलापूर हा जिल्हा उष्ण कटिबंध वातावरणात येतो. या वातावरणाला अनुसरून येथील शेतकरी येथे पिके घेतात. पण लोकमंगल कृषी महाविद्यालयाने थंड वातावरणात स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेण्याचे ठरवले. ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात याची लागवड करून जानेवारीमध्ये याचे उत्पन्न घेतले. फक्त साडेतीन महिन्यात स्ट्रॉबेरीची फळे या रोपांना आली. 11 गुंठे जमिनीत 56 हजार रुपयांचा खर्च या लागवडीसाठी आला. 200 ते 250 किलो स्ट्रॉबेरीची फळे विकून 1 लाखांपर्यंत पैसा हाती पडला. खर्च वगळता 52 ते 53 हजार रुपयांचा निवळ नफा मिळाला. याची एकरामध्ये लागवड केल्यास एकरी 4 लाख रुपये व एका हेक्टरमध्ये लागवड केल्यास 10 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न घेणे शक्य आहे. तेही फक्त साडेतीन महिन्यांत.
लोकमंगल कृषी महाविद्यालयाची एक टीम गेल्या वर्षी सहलीसाठी महाबळेश्वरला गेली होती. तेथील महागडी स्ट्रॉबेरी खरेदी करून एक कल्पना या शिक्षकांना सुचली. याचा नवीनच प्रयोग सोलापुरात सुरू झाला. पारंपरिक शेतीला बाजूला करून स्ट्रॉबेरीची लागवड सुरू केली. त्यासाठी माळरानावरील 11 गुंठे जमीन निवडण्यात आली.
व्यापाऱ्यांची मागणी वाढली
सोलापुरात स्ट्रॉबेरी हे फळ महाबळेश्वर आणि पाचगणी येथून आणले जात होते. पण स्ट्रॉबेरी हे फळ सोलापुरात उपलब्ध झाल्याने व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे. महाबळेश्वर व पाचगणी येथील ज्यादा दराने मिळणारी स्ट्रॉबेरी आता थेट सोलापुरात उपलब्ध झाली आहे आणि तीही स्वस्त दरात.
हेही वाचा - नांदेड विभागातून 33 किसान रेल्वे धावल्या; मालवाहतूकीतून साडेसहा कोटींचे उत्पन्न
हेही वाचा - सेंद्रीय शेती करण्यासाठी सोडला आयटीतला जॉब, आता महिन्याला कमावतेय ३ लाख रुपये