सोलापूर - 'बापहो...माझ्या कीर्तनाचे व्हिडिओ काढून त्यात मोडतोड करुन ते व्हायरल करू नका', अशी विनंती कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केली. माढा तालुक्यातील पिंपळनेर येथे ग्रामदैवत श्री खंडोबा ग्रामविकास आघाडी आणि राजमुद्रा ग्रुपच्या वतीने इंदोरीकर महाराजांचे कीर्तन आयोजित केले होते.
कीर्तनाच्या सुरुवातीलाच व्हिडिओ काढून त्यात मोडतोड करून ते व्हायरल करू नका', अशी विनंती इंदोरीकरांनी केली. कोणी असे केल्यास नाईलाजाने मला त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल. शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून व्यसनापासून दूर रहा. आपण किती जगलो हे महत्त्वाचे नाही, तर कसे जगलो हे महत्त्वाचे आहे, म्हणून चांगले कर्म करत राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. सध्याच्या तरुणाईचा त्यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला.
हेही वाचा - हृदयद्रावक : मुलाची 'ती' आर्त हाक वडिलांनी ऐकलीच नाही
फोटोसाठी धडपड -
इंदोरीकर महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी माढा तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांनी गर्दी केली होती. महाराजांसोबत सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी तरुणाईची अक्षरक्ष: झुंबड उडाली होती. पोलीस बंदोबस्तात महाराजांना मंचापर्यंत पोहोचवण्यात आले.