सोलापूर- सोलापूर शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. वाढत्या चोऱ्यांवर अंकुश कधी लागणार असा सवाल नागरीकांमधून केला जात आहे. विजापूर रोडवरील विजयनगर सोसायटीत एका ज्येष्ठ पत्रकाराचे घर फोडून पावणेचार लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
गुंगीचा स्प्रे मारून चोरी केल्याचा संशय-
अज्ञात चोरट्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सुहास नारायण जोशी (वय-६६,रा. विजय सोसायटी दंतकाळे हॉस्पिटल मागे विजापूर रोड सोलापूर) हे व त्यांच्या घरातील सर्वजण जेवण करून नेहमीप्रमाणे घराचा दरवाजा बंद करून झोपले होते. गाढ झोप लागल्यामुळे चोरट्यानी अलगद घरात प्रवेश केला. आणि कपाटचे लॉक उघडून सोन्या चांदीचा ऐवज लंपास केला. एवढी गाढ झोप कधीच लागली नाही, अशी माहिती जोशी कुटुंबियांनी दिली आहे. चोरट्याने घरातील कपाट तोडून ऐवज लंपास केला. चोरीपूर्वी चोरांनी गुंगीचा स्प्रे वापरला असल्याची शक्यता जोशी कुटुंबीयांनी वर्तवली आहे.
लाखोंचा ऐवज चोरीला
सुहास जोशी यांच्या घरातून पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, पंधरा हजार रुपये किमतीचे अर्धा तोळे वजनाचे मंगळसूत्र, पंधरा हजार रुपये किमतीची अर्धा तोळा वजनाची सोन्याची अंगठी, पंधरा हजार रुपये किमतीच्या अर्धा तोळे वजनाच्या छोट्या रिंग, ९० हजार रुपये किमतीच्या तीन तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या, तीस हजार रुपये किमतीची एक तोळे वजनाची सोन्याची चैन, पंधरा हजार रुपये किमतीची अर्धा तोळे वजनाची सोन्याची अंगठी, चार हजार रुपये किमतीची चांदीची दत्तमूर्ती, चांदीची वाटी, कुंकू, करंडा, चांदीची नाणी असा मिळून एकूण 3 लाख ४१ हजार पाचशे रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.
शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले
या चोरीची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. गणेश उत्सवाच्या काळात देखील शहरातील मोबाईल दुकाने फोडली होती. आजपर्यंत या चोरीचा तपास लागला नाही. पोलीस ठाण्यात चोरीच्या तक्रारी फक्त दाखल होतात, मात्र चोरांचा शोध लागत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.