सोलापूर - सांगोला तालुक्यात काही दिवसांपासून घडत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे सांगोला शहर आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. कर्तव्याचा बोजवारा करणारे पोलीस मात्र चोरीच्या घटनांचा फक्त नोंद करून घेण्यात मग्न आहेत. आठवडा बाजारात तर चार ते पाच मोबाईल चोरीच्या घटना दर रविवारी पोलिसांच्या नाकावर टिच्चून होताना दिसत आहेत. गुन्ह्यांचा शोध घेणारे डी.बी. पथकाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. गेली पंधरा दिवस रात्रीची गस्त बंद केल्याचेही काही व्यापारी व खासगी सुरक्षा रक्षकांनी व्यक्त केली आहे.
दोनच दिवसांपूर्वी सांगोला शहरातील लगबगलेल्या स्टेशन रोडवरील माळी मशिनरी स्टोअर्स, संगम हौस, बालाजी स्वीट मार्ट, महात्मा फुले चौकातील एक मेडिकल तसेच मिरज रोडवर असलेले महालक्ष्मी टूल्स, महालक्ष्मी गॅस एजन्सी फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. त्यामुळे घाबरलेल्या व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे धाव घेवून आपले संरक्षण करण्याची मागणी केली आहे.
दिवसा ढवळ्या गाड्या चोरून नेण्याचे धाडस चोरट्यामध्ये वाढलेले आहे. जणू काही पोलिसांचा धाकच राहिला नाही अशा अविर्भावात चोर पलायन करीत आहेत. चोरांचा कर्दनकाळ ठरणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक शहर बीटला नेमणूक करण्याची मागणी सुजाण नागरिक, व्यापारी यांनी केली आहे. तसेच रात्र गस्त वाढवावी, अशी मागणी अनेक सामाजिक संघटना करीत आहेत. तसेच किमान सांगोला शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे चालू करावे, तसेच पोलीस अधीक्षकांनी लक्ष देऊन सांगोला शहर व तालुक्यातील नागरिकांना दिलासा देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
हेही वाचा - अक्कलकोटला निघालेल्या भरधाव चारचाकीची ट्रकला धडक; मुंबईचे तीन ठार