सोलापूर - जवळपास 8 महिन्याच्या अवकाशानंतर आज सोलापूर शहर व जिल्ह्यात नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. पण, विद्यार्थी व पालकांनी यास अल्प प्रतिसाद दिला आहे. कोरोनाबाबत अजूनही पालकांच्या मनात भीती आहे. या पार्श्वभूमीवर आज 'ईटीव्ही भारत'तर्फे शहरातील पानगल उर्दू शाळेचा आढावा घेण्यात आला. यावेळी शाळेत कमी प्रमाणात विद्यार्थ्यांनी हजेरी लावल्याचे दिसून आले.
वर्गात येण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे सॅनिटायझेशन
पानगल शाळेच्या आवारात किंवा वर्गात येताना आधी विद्यार्थ्यांना सॅनिटाइझ करण्यात आले. यावेळी विना मास्क विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरात किंवा वर्गात जाण्यास मनाई करण्यात आली.
पालकांनी शिक्षकांशी साधला संवाद
पालकांच्या मनात कोरोना विषाणूची भीती आहे. अनेक पालक आपल्या पाल्यांसोबत शाळेत आले होते. त्यांनी शिक्षकांशी संवाद साधून आरोग्य सुरक्षित शिक्षण मिळावे, अशी विनंती केली.
एका बेंचवर फक्त एकच विद्यार्थी
दिवसभरात दोन सत्रात शाळा सुरू करण्यात आली आहे. गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांचे धडे प्राधान्याने शिकवले जात आहेत. विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये म्हणून शालेय प्रशासनाने एका बेंचवर एकाच विद्यार्थ्यास बसण्याची व्यवस्था केली आहे. तसेच, शाळा सुरू होण्यापूर्वी वर्गांची स्वच्छता करण्यात आली आहे. अनेक वर्गांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. शिक्षकांची कोरोना तपासणी किंवा अँटिजेन टेस्ट करण्यात आली आहे, अशी माहिती शालेय प्रशासनाने दिली.
हेही वाचा - वीजबिलात सवलतीसाठी महावितरण कार्यालयासमोर भाजपकडून वीजबिलांची होळी