सोलापूर : बिआरएसचे संभाजीनगरचे नेते कदीर मौलाना यांनी औरंगजेबाचे समर्थन केले होते. याप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) विरोधात आंदोलन केले. तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना महाराष्ट्रात पाय ठेवायचा असेल तर, छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक व्हावे लागेल, अशी मागणी हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी हिंदूराष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या प्रतिमेला शाई फासली. तसेच केसीआर यांचे पोस्टर पायदळी तुडवत निषेध करण्यात आला.
औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या मौलानाचा विरोध : औरंगाबाद जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी (बीआरएस) पक्षाचे नेते कदीर मौलाना यांनी आम्ही औरंगजेबाला मानणार, त्याने एकेकाळी एकहाती देशात सत्ता गाजवली होती. त्यांच्या राज्यात कोणताही जातीवाद त्यावेळी नव्हता. त्यामुळे आम्ही औरंगजेबाला आदर्श मानणार असे विधान कदीर मौलाना यांनी केले होते. त्यावरुन आज सोलापूरात हिंदू राष्ट्र सनेच्या कार्यकर्त्यांनी बीआरएसचा निषेध करीत केसीआर यांच्या प्रतिमेला काळे फासले.
बीआरएसला हिंदू राष्ट्र सेनेचा इशारा : केसीआर यांना महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक व्हावे लागेल. तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या पक्षातील नेते हे औरंगजेबाचे खुलेआम समर्थन करत आहेत. त्यांच्या हिंदू राष्ट्रसेनेच्या वतीने सोलापुरात विरोध करण्यात आला. बीआरएस पक्षाला महाराष्ट्रात पाय ठेवायचा असेल तर, त्यांना महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक व्हावे लागेल, असा इशारा हिंदू संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
सुरेखा पाटील यांची उमेदवारी निश्चित : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने (BRS) महाराष्ट्रात मोठ्या दणक्यात प्रवेश करताच आगामी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री केसीआर यांच्या उपस्थितीत बीआरएसमध्ये सामील झालेल्या माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा पाटील यांची सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाली आहे. माळशिरसचे माजी आमदार दिवंगत शामराव पाटील यांच्या त्या कन्या आहेत.
हेही वाचा- BSR : 'या' कॅबिनेट मंत्र्यांच्या मतदार संघात बीआरएसचा उमेदवार ठरला; माजी आमदाराची लेक उतरणार मैदानात