सोलापुर- जिल्ह्यात गुरुवारी एकाच दिवसात एकुण 1744 रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे, तर एकूण 940 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे गुरुवारी जिल्ह्यात एकूण 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत सोलापुरात एकूण ॲक्टिव रुग्णांची संख्या 10143 आहे. कोरोना महामारी रोखण्यासाठी शासन विविध स्तरावर उपाययोजना करत आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागातील रुग्ण संख्या हळूहळू कमी होत चालली आहे. सोलापूरच्या शहरी भागात फक्त दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरात कोरोना विषाणूवर मात करताना शासन यशस्वी होताना दिसून येत आहे.
सोलापूर ग्रामीण अहवाल
सोलापूर जिल्हा आरोग्य प्रशासनाने ग्रामीण भागात 5609 नागरिकांची तपासणी केली होती, यामध्ये एकूण 888 नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.यामध्ये 489 पुरूष आणि 399 स्त्रीया आहेत.
सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी एकूण 1670 रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे परंतू सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मृतांचा आकडा कमी होताना दिसत नाही. गुरुवारी उपचारादरम्यान 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज ही 9552 रुग्ण अॅक्टिव आहेत.
सोलापूर शहर अहवाल
सोलापूर आरोग्य प्रशासनाने शहरात 2105 नागरिकांची तपासणी केली आहे. तपासणी अंती 52 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे, लागण झालेल्यामध्ये 30 पुरुष आणि 22 स्त्रिया आहेत. आज एकूण 74 रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. उपचारादरम्यान 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात गुरुवार पर्यंत 591 ऍक्टिव रुग्ण असून त्यांचे विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे.
हेही वाचा-कोरोना बाधित रुग्णांना जादा आकारलेले 20 लाख रुपये परत करण्याचे आदेश