सोलापूर - जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात दरवर्षी हुरडा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या महोत्सवात अक्कलकोट येथील प्रमोद पाटील हे दररोज हजारो लोकांना मोफत हुरड्याचा आस्वाद देत आहे. स्नेहभाव, बंधुता वाढावी, तसेच समाजसेवा करण्याच्या उद्धेशाने पाटील यांच्याकडून मोफत हुरड्याचे वाटप सुरू आहे.
हेही वाचा - चालत्या ट्रकमध्ये एक लाख १९ हजार रुपयांची लूट; दोघांना अटक
राज्यभरातील अनेक जण हुरडा महोत्सवात सहभागी होत आहेत आणि लुसलुशीत हुरड्याचा आस्वाद घेत आहेत. महोत्सवात प्रमोद पाटील आणि शिवराज बिराजदार स्वतः येणाऱ्या सर्वांना आस्थेने हुरडा खाऊ घालतात. सर्वच बाबतीत आर्थिक दृष्टिकोनातून पाहून चालत नाही, निस्वार्थ भावनेने हुरडा खायला घातल्याने एक प्रकारे मनाला शांती मिळते. दैव आशीर्वादाने सर्वकाही सुरळीत असल्याची माहिती पाटील कुटुंबातील सदस्यांनी दिली.
दीड महिना हुरडा महोत्सव साजरा केला जातो
सोलापूर जिल्ह्यापासून फक्त 50 ते 60 किमी अंतरावर असलेल्या अक्कलकोट तालुक्यात फक्त एकच चर्चा आहे. ती म्हणजे हुरडा महोत्सव. अक्कलकोट येथे स्वामी समर्थ दर्शनाला आलेले भाविक हुरडा महोत्सवात सहभागी होऊन मोफत हुरड्याचा आस्वाद घेत आहेत. यंदा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला हुरडा महोत्सवाचे उद्घाटन झाले. दरवर्षी जानेवारी महिन्यात हा महोत्सव सुरू होतो. पंरतु, यंदा अक्कलकोट तालुक्यात पाऊस भरपूर झाल्याने पेरणीला उशीर झाला. यामुळे हा महोत्सव महिनाभर उशीरा सुरू झाला. या महोत्सवाची अनेक जण आतूरतेने वाट पाहत होते. महोत्सवात राजकीय, सामाजिक, सर्व समाजघटकातील नागरिक उपस्थित असतात. सोलापूर, मुंबई, पूणे, कर्नाटकमधून दररोज शेकडो लोक या हुरडा महोत्सवाचा आनंद घेतात.
फक्त समाजसेवा एवढेच उद्दिष्ट
प्रगतशील शेतकरी प्रमोद पाटील यांचे पणजोबा शामराव पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपूर्वी हुरडा पार्टी देण्याची सुरुवात केली. शामराव पाटील यांचे सुपुत्र शिवशंकर पाटील यांनी देखील ही प्रथा सुरू ठेवली. शिवशंकर पाटील यांचे चिरंजीव प्रमोद पाटील हे गेल्या बारा वर्षांपासून अक्कलकोट येथे हुरडा महोत्सवाचे आयोजन करत आहेत. माणूसकी जपावी आणि माणसांमध्ये स्नेह भाव वाढावा या उद्देशाने ते शहरी व ग्रामीण भागातील लोकांना हुरडा महोत्सवातून मोफत हुरडा देतात. गरम गरम भाजून लुसलुशीत आणि ताजा हुरडा खाण्यासाठी या महोत्सवाला भरगोस प्रतिसाद मिळत आहे.
आजतागायत आपण राजकारण्यांच्या अनेक हुरडा पार्ट्या पहिल्या, किंवा शेतात राजकीय पार्ट्या झालेल्या पाहिल्या. पण या पार्ट्यांमागे काहीतरी उद्देश असतो. पण, प्रमोद पाटील यांच्या हुरडा महोत्सवातून निस्वार्थ भावनेने जनतेची सेवा केली जात आहे. केवळ समाजसेवा म्हणून हुरडा महोत्सवातून लोकसेवा करत असल्याची माहिती प्रमोद पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
हुरड्याबरोबर सेंद्रिय गूळ, शेंगा चटणी आणि फरसाण देखील मोफत
दररोज शेकडोच्या संख्येने लोक या महोत्सवात सहभागी होत आहेत. येणाऱ्या प्रत्येकाला अतिशय आदराने वागणूक देत गरम गरम आणि लुसलुशीत हुरडा दिला जातो. हुरड्यासोबत सेंद्रिय गूळ, शेंगा चटणी, फरसाण, मीठ हे देखील मोफत दिले जाते. या बदल्यात एक रुपया देखील मागणी केली जात नाही. पण, या शेतकऱ्याला दररोज शेंगा चटणी, फरसाण, मीठ विकत आणावे लागत आहे. जवळपास 10 ते 15 हजार रुपये या शेतकऱ्यास खर्च करावे लागत आहे. सकाळी 11 ते रात्री 11 पर्यंत ही सेवा सुरू आहे.
हुरडा महोत्सवासाठी पाच एकरमध्ये हुरड्याची पेरणी
पाटील कुटुंबाची जवळपास 42 एकर बागायत शेती आहे. या बागायत शेतीमधून फक्त 5 एकरात हुरड्याची लागवड केली आहे. यामध्ये कुचकुची, नारीबाल, गूळभेंडी, सुरती असे विविध हुरड्याची लागवड केली आहे. एकरी 10 लाख रुपयांचे उत्पन मिळते, तरी देखील प्रमोद पाटील यांनी जवळपास 5 एकरमध्ये फक्त जनतेसाठी हुरडा लागवड केली आहे. या पाच एकरमधून दरवर्षी 50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते, पण याचा कोणताही विचार न करता हुरडा महोत्सवासाठी 5 एकर शेती राखीव ठेवली आहे.
हेही वाचा - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उमेश परिचारक एकाच मंचावर, राजकीय चर्चेला उधाण