सोलापूर - शहरातील वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आर्थिक दंडाचे आदेश काढले आहे. कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करण्यासाठी सोलापूरातील नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे दंडात्मक कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.
सोलापूर शहरात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहेत. प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असले तरी नागरिकांकडून मात्र कोरोनाच्या संदर्भातील नियमांचे पालन केले जात नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. नागरिक नियमांचे पालन करत नसल्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
नागरिकांनी सार्वजनिक स्थळी, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासामध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, चेहऱ्यावर मास्क किंवा रूमाल वापरणे बंधनकारक आहे. स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक असून नाक, डोळे व तोंड यांना स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, असे पदार्थ विक्री करणारी दुकाने व पानटपऱ्या बंद ठेवण्यात याव्यात. दुचाकीवर केवळ चालक, तीन चाकी वाहनात चालक व इतर दोन आणि चार चाकी वाहनात चालक व इतर दोघांना परवानगी असेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
असा असेल आर्थिक दंड
मास्क न वापरल्यास - 100 रूपये
दुचाकीवर दोघांनी प्रवास केल्यास - 500 रूपये
दुचाकीवर तिघांनी प्रवास केल्यास - 750 रूपये
तीन चाकी वाहनात चालकासह तीनपेक्षा अधिक व्यक्ती बसल्याचे आढळल्यास - 500 रूपये (वाहन चालकांकडून प्रती व्यक्ती)
चारचाकी वाहनातून चालकासह तिघांपेक्षा जास्त जणांनी प्रवास केल्यास - 500 (वाहन चालकांकडून प्रती व्यक्ती)
निर्धारित वेळेनंतर दुकान सुरू ठेवल्यास (अत्यावश्यक सेवा वगळून) - एक हजार दंड
दोनवेळा दंड झाल्यास तिसऱ्यावेळी दुकानाचा परवाना 15 दिवसासाठी निलंबित.
साठ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले मालक किंवा नोकर दुकानात आढळल्यास सात दिवसांपर्यंत दुकान सील
दुकानात पाचपेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास - 500 रूपये आणि दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास एक हजार रूपये दंड
होम क्वारंटाइन योग्य रितीने न पाळल्यास - एक हजार रूपये
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास - 200 रूपये
सुरक्षित अंतर न ठेवल्यास - 100 रूपये (प्रत्येकी)
सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, तंबाखूचे सेवन केल्यास - 500 रूपये
दुकानदार/व्यावसायिक/फिरते फळ व भाजी विक्रेते मास्क न वापरल्यास - 100 रूपये
हेही वाचा - जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी केले खत वाटप