सोलापूर - व्होडाफोन आणि आयडिया या कंपन्यांच्या ग्राहकांचे लाखो फोन गुरुवारी सकाळी अचानक बंद झाले. नेटवर्क अचानक गायब झाल्याने ग्राहकांची सात रस्ता येथील व्होडाफोन-आयडिया मुख्य कार्यालयाजवळ गर्दी केली होती. यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने पोलिसांनी मोबाइल स्टोर बंद करायला लावले. त्यामुळे मोबाइल धारकांच्या गैरसोयीत आणखी भर पडली.
व्होडाफोन कंपनीचे सर्व्हर असलेले कार्यालय पुण्यातील कल्याणी नगरमध्ये आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मोठ्या पावसामुळे या मुख्य कार्यालयातच पाणी भरले आहे. परिणामी येथील विद्युत पुरवठा खंडित झाला. विद्युत पुरवठा बंद झाल्याचा थेट परिणाम सोलापूर जिल्ह्यातील व्होडाफोन आणि आयडिया कंपनीच्या लाखो ग्राहकांवर झाला आहे. मोबाइल अचानक बंद पडल्यामुळे अनेकांचा संपर्क तुटला. मोबाइलद्वारे होणारी कामं खोळंबल्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली आहे.
कुठूनही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ग्राहकांनी गुरुवारी सकाळी सात रस्ता येथील कंपनीच्या कार्यालयासमोर गर्दी केली होती. नागरिकांनी मोबाइल कधी सुरू होणार, बंद का झाले, आम्ही बील भरत नाही का ? नेटवर्क बंद होणार होते तर कंपनीकडून पूर्व कल्पना का दिली नाही, आदी प्रश्नाचा भडिमार सर्व्हिस प्रोव्हायडरवर केला.
स्टोरचे व्यवस्थापक उपस्थित नसल्याने नागरिकांचा पारा आणखीनच चढला होता. त्यामुळे वादावादीत आणखीच भर पडली. दरम्यान हा गोंधळ सुरू असताना वाहतूक पोलिसांची क्रेन घटनास्थळी दाखल झाली. मुख्य रस्त्यावर मोबाइल धारकांनी वाहने लावल्यामुळे वाहतूक पोलिसांनी गाड्या उचलण्यास सुरुवात केली. त्यामुळे ग्राहकांची पुन्हा धावपळ झाली. मोबाइल नेटवर्क पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे ग्राहक वैतागले होते.
यशपाल राजपूत, असिस्टंट मॅनेजर, यासोबत संपर्क केल्यानंतर त्यांनी नेटवर्क लवकरच सुरू होईल, असे सांगितले. कंपनीचे मुख्य सर्व्हर असलेल्या कार्यालय पाण्याने भरल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. परिणामी ग्राहकांना त्रास होत आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत नेटवर्क पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली.