सोलापूर - तीस वर्षांपासून पतीचा त्रास होता. अखेर या त्रासाला कंटाळून पत्नीने 15 डिसेंबर, 2018 रोजी राहत्या घरी रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली होती. या खटल्याचा निकाल लागला असून पत्नीस तीस वर्षे मानसिक व शारीरिक त्रास दिला. त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असा गुन्हा सिद्ध झाला. याबाबत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. जगताप यांनी महादेव नारायण मोरे (वय 54 वर्षे, रा. अक्कलकोट, जि. सोलापूर) यास चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे व तसेच एक हजार रुपये दंडही ठोठावला आहे.
आरोपी पती हा तीस वर्षांपासून देत होता त्रास
जयश्री हिचे तीसवर्षांपूर्वी महादेव मोरेसह लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी महादेव मोरे हा पत्नी जयश्रीला शारीरिक व मानसिक त्रास देत होता. 15 डिसेंबरला जयश्री ही घरी आराम करत असताना महादेवने शेतात कामाला जा म्हणून दारू पित त्रास देऊ लागला. पती महादेवच्या सततच्या त्रासाला कंटाळून जयश्रीने राहत्या घरी चिमणीमधील रॉकेल स्वतःवर ओतून पेटवून घेतले. जखमी जयश्रीला नातेवाईकांनी ताबडतोब शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. नातेवाईकांनी जयश्रीला रुग्णालयात दाखल करताना स्टोव्हच्या भडक्यात जयश्री भाजल्याची खाटी माहिती पोलिसांना दिली होती. त्या माहितीवरुन तशी नोंदही करण्यात आली होती. पण, अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी खरी माहिती समोर आणून जयश्रीचा जबाब नोंद करून घेतला.
उपचार सुरू असताना जयश्रीचा मृत्यू, मृत्यू पूर्व जबाबची नोंद
अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी जयश्री मोरेचा मृत्यू पूर्व जबाब नोंदवून घेतला. त्यावेळी त्याने पती महादेव मोरे हा गेल्या तीस वर्षांपासून सतत त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून चिमणी मधील रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. अशी फिर्याद मृत्यू होण्यापूर्वी जयश्रीने पोलिसांना दिली. हि नोंद पोलिसांनी तपास अहवालात जोडून कोर्टात सादर केली.
कोर्टाने मृत्यू पूर्व जबाबाची नोंद घेऊन शिक्षा ठोठावली
अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी जयश्री मोरे हीचा मृत्यू पूर्व जबाब कोर्टात सादर केला. कोर्टात हा खटल्याची सुनावणी होताना 11 साक्षीदार तपासण्यात आले. जयश्री मोरे याचे नातेवाईक फितूर झाले होते. तरी देखील कोर्टाने जयश्री मोरे याचा मृत्यू पूर्व जबाब आणि सरकारी वकील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून महादेव मोरे यास चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यामध्ये सरकार तर्फे अॅड. प्रेमलता व्यास, आरोपी तर्फे अॅड. गुरुदेव कुदरी यांनी काम पाहिले.
हेही वाचा - वाझे प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - रामदास आठवले