सोलापूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्याची अंमलबजावणी राज्यभर सुरू झाली आहे. अत्यावश्यक सेवांना या लॉकडाऊन मधून सूट देण्यात आली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत नियमावली पाळून व्यवहार करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, नागरिक कोरोना नियम पायदळी तुडवत असल्याचे चित्र सोलापूर मार्केट यार्डमध्ये दिसले. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज (गुरुवारी) सोलापूर मार्केट यार्डात मोठी गर्दी झाली होती.
दोन दिवसांच्या सुट्टीनंतर मार्केट यार्डात गर्दीचा लोंढा -
गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दोन दिवस सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होती. त्यामुळे शेतकरी वर्ग आणि व्यापाऱ्यांचे व्यवहार झाले नाहीत. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर गुरुवारी सकाळी शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीमाल घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाले होते. शेतकरी आल्याने इतर व्यापारी देखील खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते.
व्यापारी आणि शेतकरी वर्गात लॉकडाऊनचा धसका -
शेतीमाल हा वेळेवर विकला गेल्यास त्याला योग्य भाव मिळेल. शेतीमाल हा नाशवंत असल्याने शासनाने शेतकऱ्यांना लॉकडाऊनमध्ये देखील शेतीमाल विकण्यास परवानगी दिली आहे. मात्र, मार्केट यार्डात व्यपारी आणि शेतकऱ्यांनी लॉकडाऊनचा धसका घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे खरेदीसाठी व विक्रीसाठी एकच झुंबड पहावयास मिळाली.