सोलापूर - रस्त्यावर भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुंडांची दादागिरी सुरू असल्याचा प्रकार सोलापुरात उघडकीस आला आहे. रस्त्यावर भाजीपाला विकायचा असेल तर पैसे आणि मोफत भाजीपाला द्यावा लागेल. त्याचबरोबर पैसेही द्यावे लागतील, अशी मागणी स्थानिक गूंडाकडून केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सोलापूर शहरातील भैय्या चौकात मंगळवेढा रोडवर एक शेतकरी वाहनात आपल्या शेतातील भाजीपाला विक्रीसाठी उभे होता. या शेतकऱ्याला या ठिकाणी भाजीपाल्याची विक्री करायची असेल तर मोफत भाजीपाला द्यावा लागेल आणि पैसेही द्यावे लागतील नाही तर येथे गाडी उभी करायची, नाही असा दम स्थानिक गूंडाकडून दिला जातो. गूंडाकडून केली जाणारी दररोजची दादागिरी आणि हप्तेखोरी पाहता या शेतकऱ्याने दमदाटी करणाऱ्या या गूंडाचा व्हिडिओच आज शनिवारी दूपारच्या सुमारास काढला आहे.
भाजीपाला विक्रीसाठी बसलेल्या या शेतकऱ्याला गाडी काढण्यासाठी दमदाटी करतानाचा हा व्हिडिओ असून यामध्ये तो गूंड तूला काय करायचे ते कर मला काहीही फरक पडत नाही, अशी धमकी देत गाडी काढायला लावत आहे. पैसे आणि मोफत भाजीपाला दिला नाही तर या ठिकाणी भाजीपाल्याची गाडी लावू देणार नाही, असे सांगणारा हा गुंड सोलापूर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उत्पादित केलेला शेतमाल विकायला आणल्यावर त्या शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी जर गुंडाना हप्ता द्यावा लागणार असेल आणि सोलापूर सारख्या शहरात हा प्रकार घडत असेल तर हा सर्व प्रकार विचार करायला लावणारा आहे.