माढा (सोलापूर) - राज्यभरातील निवासी आश्रमशाळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरी असल्याने पोषण आहार मिळणेही बंद आहे. मात्र, माढ्यातील नवयुग शिक्षण सामाजिक संस्था संचलित मातोश्री हरहरे या प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळेने १२० विद्यार्थ्याना त्यांच्या गावी जाऊन घरपोच अन्नधान्यचे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. शाळा सुरु होईपर्यंत हा उपक्रम दर महिन्याला सुरुच राहणार आहे. विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी ही राज्यातील पहिली आश्रमशाळा ठरली आहे.
उपक्रम गेल्या २ महिन्यांपासून सुरु
कोरोनामुळे गेल्या दिड वर्षापासून आश्रमशाळा बंद असल्याने निवासी विद्यार्थी घराकडे परतले आहेत. राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागाकडून आश्रमशाळांना मिळणारे परीपोषण अनुदान बंद झाले आहे. त्यामुळे शालेय पोषण आहाराच्या लाभापासून हे विद्यार्थी उपेक्षितच राहतात. कोरोना लाॅकडाऊनमुळे या गोरगरिब पाल्याचे कुटूबांच्या उदरनिर्वाहाचे मजुरीचे व्यवसाय देखील ठप्पच होते. यामुळे मोठा आर्थिक पेच विद्यार्थ्यांच्या पालकांसमोर उभा ठाकला होता. ही उणीव ध्यानी घेऊन निवासी १२० विद्याथ्याॅना घरपोहच अन्नधान्य,खाद्य दिले जात असुन यात पाच किलो गहु,पाच किलो तांदुळ यासह एक डझन बिस्कीट पुडे यांचा समावेश आहे. संस्थेचे सचिव महेश हरहरे यांच्या पुढाकारातुन उपक्रम गेल्या २ महिन्यांपासून सुरु आहे. उपक्रमास संस्थेतील शिक्षकासह कर्मचाऱ्यानी देखील आर्थिक हातभार लावला आहे.
शिक्षकांनीदेखील आर्थिक हातभार देऊन प्रतिसाद
सहा पथके तयार करुन दर महिन्याला सोलापुर, लातूर, उस्मानाबाद, बीड, परांडा, परळी, पाथरी, माजलगाव यासह अन्य भागातील विद्यार्थी वेगवेगळ्या वर्गात शिक्षण घेत आहेत. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना पालक घरी घेऊन गेले. मात्र, कुटूबांसह पाल्याची गुजराण करण्याची समस्या होती. अशा वेळी माढ्याच्या गोदावरी आश्रमशाळेने दिलेली मदत लाख मोलाची अशीच ठरली आहे. सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात देण्याची संकल्पना संस्थेतील शिक्षकांसमोर महेश हरहरे मांडली होती. त्यास शिक्षकांनीदेखील आर्थिक हातभार देऊन प्रतिसाद दिला. त्यानुसार लाॅकडाऊन जाहीर झाल्यापासून प्रत्येक महिन्याला शाळेचे पथक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अन्नधान्य व खाद्य पोहच करण्याचे काम करीत आले आहे. सध्यादेखील ते सुरुच आहे. मुख्याध्यापक किरण जाधव, सुनील काळे यांचेसह सर्वच शिक्षक, कर्मचारी यांनीदेखील या उपक्रमाला पाठबळ दिलंय.
या शाळेने इतर निवासी आश्रमशाळा चालकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केलंय.
अन्नधान्य, खाद्य पोहच करण्याचा उपक्रम
गोरगरीब कुटूबांतील विद्यार्थी व त्यांच्या पालकांची परिस्थिती पाहता आणि विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वेदना जाणून घेताना त्यांनी व्यक्त केलेल्या अडचणी ऐकून मन सुन्न झाले. आणि तातडीने संस्थेतील शिक्षकांच्या मदतीने प्रत्येक महिन्याला अन्नधान्य, खाद्य पोहच करण्याचा उपक्रम हाती घेतला.जोपर्यंत आश्रमशाळा सुरु होत नाही. तोपर्यंत ही मदत सुरुच राहणार असल्याचे संस्थेचे सचिव महेश हरहरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
१२० विद्यार्थ्यांना घरपोच अन्नधान्य
आश्रमशाळेत शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या सर्वच विद्यार्थ्याची बिकट परिस्थिती होती. अनेकाच्या पालकांचे व्यवसाय लाॅकडाऊनमुळे ठप्पच राहीले. त्यातच हे विद्यार्थी शाळेतून घरी गेल्याने घर कसे चालवायचे असा प्रश्न त्याच्या पुढे उभा झाला होता. ही उणीव ध्यानी घेऊन शाळेतील १२० विद्यार्थ्यांना घरपोच अन्नधान्य व खाद्य दिले जात आहे. उपक्रम राबवित असताना मोठा आनंद मिळत असल्याचे आश्रमशाळेचे मुख्याध्यापक किरण जाधव यांनी सांगितले.