पंढरपूर (सोलापूर)- शहरात पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोरोनाने मोठे थैमान घातले होते. कोरोनामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर दीड वर्षापासून बंद आहे. त्यात पंढरीच्या चारही वाऱ्या रद्द झाल्या होत्या. आषाढी वारीसह प्रमुख वाऱ्यांवर पंढरपूरचे अर्थकारण चालत असते. मात्र या चार वाऱ्या रद्द झाल्यामुळे विठ्ठल मंदिर परिसरातील व्यापारी व कुटुंबावर उपासमारीची वेळ आहे. तामिळनाडू येथील विठ्ठलदास महाराज यांच्या वतीने 300 किराणा व धान्य किटचे वाटप व्यापारी व किरकोळ विक्रेते असणाऱ्या कुटुंबाला करण्यात आले आहे.
पांडुरंगाच्या प्रमुख वाऱ्या रद्द, पंढरीतील अर्थकारणावर मोठा परिणाम
सोलापूर जिल्ह्याला कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा मोठा तडाखा बसला होता. त्यामुळे पंढरपूर शहरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर गेल्या दीड वर्षापासून लॉक-अनलॉक प्रक्रियेत चालू बंद ठेवण्यात आले आहे. या दीड वर्षाच्या काळामध्ये लहान मोठ्या बारा एकादशी व सहा मोठ्या वाऱ्या रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे पंढरीतील आर्थिक चक्रही मंदावले आहे. विठ्ठल मंदिर परिसरातील व्यापारी व किरकोळ हार-फुले विक्रेत्यांना उपजीविकेचे साधनच बंद झाले होते. त्यामुळेच तामिळनाडू येथील विठ्ठलदास महाराज यांच्या वतीने या गोरगरीब व्यापाऱ्यांना अत्यावश्यक लागणाऱ्या किराणा मालाच्या किटचे वाटप करण्यात आले.
गेल्या दीड वर्षापासून विठ्ठल मंदिर लॉक-अनलॉक प्रक्रियेत
श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसरातील लहान-मोठे सुमारे एक हजार व्यापारी आहेत. मात्र गेल्या 17 मार्च 2020 साली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कोरोनाच्या पहिल्या लाटेत बंद करण्यात आले होते. सहा महिन्यांनी दिवाळीच्या पाडव्याला मुखदर्शनासाठी पांडुरंगाचे मंदिर भाविकांसाठी खुले झाले. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांना तीन ते चार महिने व्यापार करण्याची संधी मिळाली होती. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे 5 एप्रिल 2021 पासून विठ्ठल मंदिर पूर्णपणे बंद करण्यात आले. यामुळे गेल्या दीड वर्षात सुमारे सहा प्रमुख वाऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यातील प्रमुख आषाढी वारी सोहळा शासनाकडून रद्द करण्यात आला.