सोलापूर - शहरात बुधवारी सायंकाळी मुसळधार पावसाने वाहन चालकांना चांगलीच कसरत करायला लागली. सायंकाळी साडेपाचला सुरू झालेला पाऊस तब्बल तीन तास कोसळत होता. या मुसळधार पावसामुळे सोलापूर शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते.
यंदाच्या पावसाळ्यामध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी होते. मात्र, परतीच्या पावसाने सोलापूरला चांगलेच झोडपले आहे. यामुळे सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. सलग चौथ्या दिवशी सोलापूर शहरात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले होते. सोलापूर बसस्थानकाच्या समोर साचलेल्या पाण्यामुळे चार चाकी वाहनांना रस्त्यावरून जाणे देखील मुश्कील झाले होते. त्यामुळे सोलापूर बसस्थानकासमोरील दुभाजक फोडून साचलेल्या पाण्याला मोकळी वाट करून दिली.
हेही वाचा - सत्ताधारी पक्षातील १००-२०० जणांशिवाय काश्मीरमध्ये कोणीही आनंदी नाही - गुलाम नबी आझाद
तब्बल तीन तास सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातील घरांमध्ये पाणी साचले होते. शहरातील सर्वच ठिकाणच्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्याने कुंभार वेस, बाळी वेस, बसस्थानक सम्राट चौक या ठिकाणच्या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. रात्री ९ वाजेपर्यंत पावसाचा जोर कायमच असल्यामुळे सखल भागातील पाण्याचा निचरा होण्यास अडचण येत होती.
हेही वाचा - ईडीचा पाहूणचार स्वीकारण्यासाठी जाणार, पवारांनी केले स्पष्ट