पंढरपूर - सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यातील मराठा समाजाचे आरक्षण घटनाबाह्य ठरवून रद्द करण्यात आले आहे. याचे पडसाद राज्यासह जिल्ह्यामध्ये पडताना दिसत आहेत. पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा समन्वयक समिती व मराठा ठोक मोर्चाच्यावतीने अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
पंढरपुरात अर्धनग्न आंदोलन
सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणासंदर्भातील गायकवाड अहवाल हा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजातील बांधवांनी राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाच्यावतीने अर्धनग्न आंदोलन करत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी राज्य सरकार व केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात ठोस भूमिका न मांडल्यामुळे जाहीर निषेध केला.
राज्यातील लोकप्रतिनिधींना घराबाहेर न पडून देण्याचा इशारा
राज्य मराठा समन्वयक धनाजी साखळकर यांनी म्हटले, मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्याचे त्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला. त्याचबरोबर सध्याच्या कोरोना परिस्थितीमधील मराठा समाज कोणत्याही प्रकारचा टाळेबंदी पाळणार नाही. राज्यातील लोकप्रतिनिधींना घराबाहेर न पडून देण्यासाठी इशारा त्यांनी यावेळी दिला. मराठा समाजाचे नेते म्हणाले, केंद्र व राज्य सरकारांनी मराठा समाजाबाबत मिळून कूटनीती केली आहे. त्यामुळे दोन्ही सरकारचा मराठा समाजाच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करत आहात. राज्यातील मराठा ठोक मोर्चा पदाधिकाऱ्यांची काही वेळातच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग आयोजित केलेली आहे. त्यानंतर राज्यातील लोकप्रतिनिधींना मराठा समाजातील महिलांच्या माध्यमातून साडीचोळीचा आहेर देण्याचा इशारा नेत्यांनी दिला आहे.