सोलापूर- शहराला लागून असलेल्या हगलूर, हिप्परगा, दहिटने, शेळगी परिसरात बेकायदेशीर खडी क्रशर चालकांकडून गौण खनिजांचे उत्खनन केले जात आहे. या खडी क्रशरमधील धुळीमुळे हजारो एकर शेतजमीनीचे नुकसान होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक होत आहेत. प्रशासनाच्या मिली भगतमुळे हे शेतीस अपायकारक खडी क्रेशर सुरू असल्याच्या तक्रारी अनेक शेतकरी करीत आहेत. अनेक वेळा स्थानिक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली. मात्र, शेतकऱ्यांच्या तक्रारी अर्जाला केराची टोपली दाखवून बेकायदेशीर दगड व मुरूम उपसा सुरूच असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. हगलूर हद्दी मध्ये बेकायदेशीर 6 खडी मशीन असल्याची माहिती समोर येत आहे.
सोलापूर शहरापासून लगतच असलेल्या हगलूर, हिप्परगा, दहिटने, शेळगी या गावामध्ये मोठ्या प्रमाणात खडीक्रेशरचा व्यवसाय चालवला जातो. यातून उडणाऱ्या धुळीचे प्रमाणही अधिक आहे. याचा परिणाम परिसराती शेती पिकांवर होत आहे. हगलूर गावाच्या शिवारात जवळपास 500 एकर शेतजमीन आहे. ही शेतजमीन नापीक होत चालली आहे. शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. कोणत्याही प्रकारचा भाजीपाला पिकत नाही. या अवैध खाणींमुळे पिकांवर धूळ साचत आहे. फळबाग वाढ होत नाही. तसेच माळरानावर गवतदेखील खाण्यायोग्य रहात नाही. एवढेच नाही तर धुळीच्या प्रादुर्भावामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक ग्रामस्थांना फुफ्फुसाचा आजार होत आहे.
हा सर्व प्रकार रोखण्यासाठी येथील ग्रामस्थांनी अनेकदा हे खडी क्रशर बंद करण्याची मागणी केली. मात्र, प्रशासनाकडून सातत्याने या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. दगड फोडण्यासाठी या खाणींमध्ये मोठे स्फोट घडवून आणले जातात, ज्यामुळे आजूबाजूच्या घरांना तडेही गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच या स्फोटाच्या हादऱ्यांमुळे बोअरवेल आणि विहिरीतील पाण्याचे प्रवाह बंद होऊन शेतकऱ्यांवर पाणी संकट ओढावू लागले आहे.
हगलूर हद्दी मध्ये बेकायदेशीर 6 खडी मशीन असल्याची माहिती समोर येत आहे. या विरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळचे उप प्रादेशिक अधिकारी प्रशांत भोसले यांच्याकडे तक्रार केली असता; आमच्याकडे सध्या मनुष्यबळ कमी आहे. तरीही बेकायदेशीर खडी मशीन किती चालू आहेत, याची चौकशी करून ते बंद करण्या बाबतचा अहवाल पुढे पाठवणार असल्याची माहिती भोसले यांनी दिली.