पंढरपूर- सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना परिस्थिती गंभीर झाली आहे. मात्र, पंढरपूर पोट निवडणुकीमुळे जिल्ह्यात आचारसंहिता लागू होती. आचारसंहितेमुळे प्रशासनाची कोणती बैठक घेता आली नाही. पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील आचारसंहिता रद्द करण्यात आली आहे. त्यातून प्रत्येक तालुक्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेत असल्याची माहिती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी दिली. पंढरपूर येथे विश्रामगृहमध्ये लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांसोबत पालकमंत्री यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे आमदार यशवंत माने, आमदार प्रशांत परिचारक, कल्याणराव काळे भगीरथ भालके यांसह जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाबाबत राजकारण न करण्याचा सल्ला -
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. कोरोना बाधित रुग्णांना जिल्ह्यात बेड उपलब्ध नाहीत किंवा ऑक्सिजनचा पुरवठा ही होताना दिसत नाही. लसीकरण बाबत प्रशासनाचा सावळागोंधळ ही उडाला आहे. त्यामुळे विरोधकांकडून पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या विरोधात टीकेची झोड उठवली होती. मात्र पालकमंत्री भरणे यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर देताना म्हणाले, पोटनिवडणुकीची आचारसहिता असल्यामुळे आपण कोणत्याही प्रकारची बैठक घेऊ शकत नव्हतो. मात्र, अधिकार्यांसोबत संपर्कात राहू काम पाहत होतो. त्यामुळे कोरोना पार्श्वभूमीवर विरोधकांनी राजकारण करू नये, असा सल्ला या वेळी दत्ता भरणे यांनी दिला.
पोटनिवडणुकीतील गर्दीमुळे मतदारसंघात कोरोना संख्येत वाढ - पालकमंत्री
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणुकीची मतदान 17 एप्रिल रोजी पार पडली आहे. चार एप्रिल पासून प्रचाराचा धुरळा उडाला होता. त्यानंतर प्रस्थापित उमेदवारांच्या नेत्यांकडून मतदार संघात लाखोच्या सभा घेण्यात आल्या. सभेमध्ये लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढल्यामुळे मतदार संघात कोरोनाने थैमान घातले आहे. बाराशेच्या आसपास कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असताना पालकमंत्री भरणे म्हणाले, पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत गर्दी झाली होती. त्यातूनच कोरोनाचा प्रादुर्भावही वाढला. त्यामुळेच मतदारसंघात कोरोनाची संख्या ही वाढली आहे. प्रशासनाकडून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात वैद्यकीय सुविधांचा तुटवडा जाणवणार नाही -
जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहे. जिल्ह्यामध्ये रेमडेसविर इंजेक्शन उपलब्ध नाही.ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होत नाही. लसीकरण ही नागरिकांना अपुऱ्या प्रमाणात पुरवले जात आहे. पालकमंत्री दत्ता भरणे म्हणाले, वैद्यकीय सुविधा बाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करत आहे. वैद्यकीय सुविधांचा तुटवडा येणाऱ्या काळात जाणवणार नसल्याचे, यावेळी त्यांनी सांगितले.
विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाईचे आदेश -
सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील नागरिक कोणत्याही कारणावरून रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच विनाकारण फिरणार यांची संख्याही मोठी आहे. पालकमंत्री दत्ता भरणे यांनी अशा नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यातूनच संचार बंदीची कडक अंमलबजावणी ही होणार आहे.