सोलापूर - कोरोना आला भटक्यांच्या आयुष्याची परवड सुरू झाली. पालावर धान्याचा एक दाणा नाही, खिश्यात एक पैसा नाही, गावातल्या लोकांकडे उरले सुरलेले अन्न मागायला जाण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांनी नियम मोडला म्हणून अर्ध्या रस्त्यात असतानाच फटके मारुन परत पिटाळले. तरुणांच्या जेवणाची सोय झाली नाही तरी चालेल पण लेकुरवाळ्या बाया, लेकरं अन् म्हातार्या-कोतार्यांच्या जेवणाचं काय? असा प्रश्न पडलेल्या भटक्यांच्या आयुष्याला समर्थांच्या अक्कलकोट नगरीत माणुसकीचं दर्शन घडलंय.

जिल्हा, तालुका सर्वच नवीन. त्यातून यांची पालं ही शहरापासून दूर मोकळ्या जागेत पडली असल्यामुळे सर्वसाधारण लोकवस्तीपासून दूरच. असे असुरक्षित वातावरण आणि जिवंत राहण्यासाठी असलेली त्यांची अगतिकता होती. अक्कलकोट शहरात तलावाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात गेल्या महिन्याभरापासून बीड, परभणी, नांदेड जिल्ह्यातून आलेल्या भटक्या जमातीतील वासुदेव आणि जोशी समाजाचे सुमारे 20 ते 25 कुटुंबं उदरनिर्वाहासाठी दाखल झालेली. गावोगावी भटकंती करून बांबूच्या टोपल्या विकण्याचं त्यांचं काम.
कोरोना आला आणि 22 तारखेपासून लागलेल्या संचारबंदीमुळे यांचे जगणे अधिकच कठीण बनले. हातावर पोट असल्यामुळे खिशात शिल्लक रक्कम नाही जी होती ती जपून वापरली. पण नंतरच्या 4-5 दिवसांतच संपली. पालातील आबाल-वृद्धांसह सर्वांचे रोजच्या खाण्याचे हाल सुरू झाले तसे आपल्या मूळ गावी मदतीसाठी यांचे फोन सुरू झाले. परंतु खासगी आणि सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद असल्यामुळे ना हे मूळ गावी जाऊ शकले ना तिथून यांना मदत मिळू शकली. दोनवेळच्या जेवणासाठी माणसं बेंबीच्या देठापासून विनंती करीत होते. त्यासाठी त्यांनी भटक्यांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या लोकधाराच्या पल्लवी रेणके यांना पालधारकांपैकी दुष्यंत गरड यांनी विनंती केली.

स्थानिक पातळीवर या पालधारकांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय होईल, अशी काही व्यवस्था करता येईल का, अशी त्यांच्याकडून विचारणा करण्यात आली. तेव्हा पल्लवी रेणके यांनी अक्कलकोटच्या दिलीप सिद्धे, उत्तमराव वाघमोडे, स्वामी समर्थ अन्नछत्राचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले आणि वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांना संपर्क साधला. या सर्वांनी अतिशय सहानुभूती व संवेदनशीलतेने क्षणाचाही विलंब न करता या पालधारकांना जागेवर तयार जेवण पोहोच करण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे दुपारच्या जेवणाची सोय अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट तर रात्रीच्या जेवणाची सोय वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, अक्कलकोट यांनी घेऊन त्यांच्या पालापर्यंत जेवण पोहचवले.
निराधार आणि पोरक्या भटक्यांच्याप्रती आस्था, संवेदनशीलतेने केलेल्या मदतीमुळं समर्थांच्या नगरीनं पुन्हा एकदा माणुसकीचं दर्शन घडवलं आहे.