सोलापूर - 80 वर्षाच्या वयोवृद्ध दाम्पत्याने स्वतः दुबार पेरणी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओ आणि सोजर व नरहरी ढेकणे यांच्या मेहनतीची ही बातमी 'ईटीव्ही भारत'ने दाखविली होती. यानंतर बार्शीच्या तहसीलदारांनी ढेकणे दाम्पत्याच्या बांधावर जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या दाम्पत्याला अंत्योदय योजनेतून धान्य, श्रावणबाळ योजनेचा लाभ तसेच घरकूल योजना देण्याची ग्वाही दिली. तसेच याबाबत कार्यवाहीदेखील सुरू केली आहे.
नरहरी सखाराम ढेकणे आणि त्यांची पत्नी सोजर नरहरी ढेकणे हे बार्शी तालूक्यातील धामणगाव येथे राहतात. नरहरी ढेकणे यांचे वय 80 वर्ष आहे. या वृद्ध दाम्पत्याला मूल बाळ नाही. मूल बाळ नसले तरी मागील 60 वर्षांपासून हे दाम्पत्य शेती करत आहेत. रोज दोघे शेतात कष्ट करतात. त्यातून निघणाऱ्या उत्पन्नातून आपली उपजीविका भागवतात. यावर्षी खरीप हंगामात त्यांनी सोयाबीनची पेरणी केली. सोयाबीनची पेरणी करण्यासाठी त्यांनी भाड्याने बैलजोडी आणून सोयाबीन पेरले. पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही. अशा परिस्थितीत पुन्हा भाड्याने पेरणी करायची कशी? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता.
दुबार पेरणीचे संकट कोसळल्यावरही या वयोवृद्ध दाम्पत्याने हार मानली नाही. पत्नीने 'मी दोरी ओढते तूम्ही पेरणी करा' असे म्हणत या दोघांनी काळ्या आईच्या उदरात नव्याने बीज रोपायला सुरुवात केली. सोजर यांनी दोरी ओढली आणि नरहरी यांनी सोयाबीन पेरणी केली.
सोजर आणि नरहरी ढेकणे या वृद्ध दाम्पत्याच्या दुबार पेरणीच्या कष्टाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओ आणि सोजर व नरहरी ढेकणे यांच्या मेहनतीची ही बातमी 'ईटीव्ही भारत'ने दाखविली होती. त्यानंतर बार्शीचे तहसीलदार प्रदीप शेलार यांनी धामणगाव येथे जाऊन या वयोवृद्धांच्या शेतात जाऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांना अंत्योदय योजनेतून तत्काळ अन्नधान्य दिले. तसेच श्रावणबाळ योजना आणि घरकूल योजनेचा लाभ देण्याची कारवाई देखील सुरू केली आहे.
हेही वाचा - धक्कादायक; कोविड रुग्णालयातून पळालेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा फुटपाथवर मृत्यू, नागरिकांमध्ये संताप
सर्व काही निसर्गावर अवलंबून असल्यामुळे....
ढेकणे दाम्पत्याजवळ 18 एकर शेती आहे. ही शेती हिंगणी, धामणगाव आणि खुंटेवाडी ( ता.तुळजापूर ) या तीन ठिकाणी आहे. ही सर्व शेती जिरायती आहे. मोठ्या कष्टाने ते मागील कित्येक दशक काळ्या आईची सेवा करून शेती करत आले आहे. सर्व काही निसर्गावर अवलंबून असल्यामुळे बैलजोडी संभाळणे परवडत नाही. तसेच शेतात सालगडीही परवडत नाही. शेतीसाठी बी-बियाणे, खते यासाठी मोठा खर्च भागत नाही. शेतीकामात मजूर भाड्याने लावणे त्यांच्याकडून निंदणी, कोळपणी, पेरणीही कामे करायचे हे प्रश्न उभे असतात.