सोलापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी समाजाने एकत्रित येत सरकारवर दबाव निर्माण करणे गरजेचे आहे. हे सरकार मराठा व ओबीसी आरक्षण या मुद्यावरून एक प्रकारे दिशाभूल करत आहे. सरकार टिकवण्यासाठी ही दिशाभूल केली जात आहे. यासाठी समाजाने एकत्रित येऊन आंदोलनाचे हत्यार उपसण्याची गरज आहे, अशी टीका मराठा समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांनी राज्य सरकारवर केली.
मराठा समाजाला आरक्षण कशा प्रकारे मिळावे. पुढील आंदोलनाची दिशा काय असावी, याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी व मराठा आरक्षणाबाबत विचारविनिमय करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील सोलापूर दौऱ्यावर आले होते. या बैठकीला सोलापुरातील सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, समनव्यक व मराठा समाजातील तरुण मोठया संख्येने उपस्थित होते. ही बैठक सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. सरकार ऐकत नसेल तर उपोषण करावेच लागणार आहे. त्यासाठी सोलापुरात देखील उपोषणासाठी आज रविवारी बैठक झाली.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या बाबतीत राज्य सरकार गाफील राहू शकत नाही. सुप्रीम कोर्टात योग्य प्रकारे म्हणणे मांडणे गरजेचे आहे. आता राज्य सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी गाव पातळीवरून लोकशाही पद्धतीने उपोषणाला सुरुवात झाली आहे. जालना जिल्ह्यातील साष्टी पिंपळगाव या गावापासून सुरुवात झाली आहे. तसेच बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे देखील मराठा समाजातील तरुणांनी व मराठा समाजाच्या नेत्यांना घेऊन आंदोलनाची सुरुवात झाली आहे. आता सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील 80 गावे देखील 10 फेब्रुवारी पासून एकामागोमाग एक असे आंदोलनाला बसणार असल्याची माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली.
मराठा आणि ओबीसी आरक्षणामध्ये वाद पेटवून दिशाभूल -
महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यामध्ये वाद पेटवत आहे. या वादामुळे राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाच्या धोरणाकडे कोणीही लक्ष देणार नाही. या त्रिमूर्ती सरकारची सत्ता टिकावी म्हणून हे राजकारण सुरू आहे. असे परखड मत अण्णासाहेब विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण कधी मागितलेच नाही तर ओबीसीचा विषय काढण्याचा प्रश्न येत नाही. असेही नरेंद्र पाटील यावेळी बोलताना म्हणाले.
या बैठकीला नरेंद्र पाटील सह माऊली पवार (सकल मराठा समाजाचे समनव्यक), अमोल शिंदे (विरोधी पक्षनेता सोलापूर महानगरपालिका), किरण पवार (मराठा क्रांती मोर्चा समनव्यक) योगेश पवार सह आदी तरुण व पदाधिकारी उपस्थित होते.