सोलापूर - जिल्ह्यासह राज्यातील शासकीय वैद्यकीय प्राध्यापकांनी विविध मागण्या करत काम बंद आंदोलन केले ( Doctors Strike For Various Demands ) आहे. यामुळे सोलापूर शासकीय रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग व शस्त्रक्रिया सर्व सेवा ठप्प झाल्या आहेत. मात्र, शिकाऊ डाक्टरांच्या खांद्यावर तातडीची वैद्यकीय सेवा व कोविड सेवेची जबाबदारी आहे. तीन मार्चपासून हे आंदोलन सुरू झाले आहे. 11 मार्च रोजी आंदोलन संपणार होते. मात्र, मागण्या मान्य न झाल्याने हे आंदोलन बेमुदत करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयातील ए ब्लॉकसमोर कामबंद आंदोलन - सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असलेल्या ए ब्लॉकसमोर वैद्यकीय अध्यापकांनी आंदोलनास सुरुवात केली आहे. दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल होतात. मात्र, डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनामुळे ओपीडीमधील सेवा आणि शस्त्रक्रिया सेवा ठप्प झाली आहे.
शिकाऊ डॉक्टरांच्या खांद्यावर शासकीय रुग्णालयाची जबाबदारी - शासकीय रुग्णालयाला संलग्नित असलेल्या डॉ. व्ही.एम. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या खांद्यावर शासकीय रुग्णालयाची जबाबदारी संभाळत आहेत. दोन दिवसांपूर्वी सोलापूर-पुणे महामार्गावर मोठा अपघात झाला होता. त्यावेळी शिकाऊ डॉक्टरांनी व वैद्यकीय अध्यापकांनी अत्यावश्यक सेवा दिली.
- शासकीय वैद्यकीय शिक्षकांच्या मागण्या
- वैद्यकीय अध्यापकांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या वैद्यकीय सचिवांची बदली करणे.
- तात्पुरत्या स्वरूपातील डीएसबी सहायक प्राध्यापकांच्या सेवा नियमित करणे.
- तदर्थ पदावरील कार्यरत अध्यापकांना कायम नेमणूक मिळणे.
- कंत्राटी तत्वावर अध्यापकांची नेमणूक न करणे.
- वैद्यकीय अध्यापकांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे भत्ते देणे.
- एम्सच्या भर्तीवर कालबध्द पदोन्नती व कालबद्ध वेतनश्रेणी देणे.
- सर्व प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे.
- वैद्यकीय अध्यापकांना कोविड भत्ता देणे.