सोलापूर - 10 टन तूर डाळीचा ट्रक घेऊन लंपास झालेल्या आरोपींना अटक करण्यात आली. पकडण्यात आलेल्या टोळीकडून पोलिसांनी 27 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चोरीची तूर डाळ विकत घेणाऱया व्यापाऱ्यांनाही आरोपी करण्यात आले आहे.
गणेश गौतम शिंदे(औढा, ता. मोहोळ जि. सोलापूर), सुजित पाटोळे, अरविंद ओहोळ( दोघे रा. मोडनिंब, जि. सोलापूर), रोहिदास गुप्ते, जितू गुप्ते, दत्ता सरवदे (तिघे रा. पुणे), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर रोहित अग्रवाल, सुभाष जोगदंडे, सुभाष अग्रवाल या डाळ विकत घेणाऱया पुण्यातील व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर येथील बंडेवार डाळमिल(कोंडी उत्तर सोलापूर) या कंपनीमधून पुणे येथे 10 टन तूर डाळ घेऊन जयहिंद ट्रान्सपोर्टचा एक ट्रक निघाला होता. गणेश शिंदे हा त्या ट्रकचा चालक होता. त्याने पुणे येथे डिलिव्हरी न देता मोडनिंब व पुणे येथील साथिदारांच्या सहाय्याने ट्रकसह तूरडाळ लंपास केली, अशी फिर्याद जय हिंद ट्रान्सपोर्टचे मालक सतीश भगरे यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दीपक दळवी यांनी तपासाची चक्रे फिरवली.
सोलापूर पोलिसांनी पुणे येथे जाऊन गणेश शिंदे याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने इतर आरोपींची व व्यापाऱयांची नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी एकूण सहा आरोपींना अटक करून 27 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणातील रोहिदास गुप्ते, जितू गुप्ते, व दत्ता सरवदे फरार आहे. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जगताप यांनी दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल देवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी तावरे, पोलीस उपनिरीक्षक दीपक दळवी, पोलीस नामदार अनिस शेख, असिफ शेख, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम शेळके, बसवराज अष्टगी, खंडु माळी यांनी ही कारवाई केली.