सोलापूर - विद्युत पुरवठा सुरळीत असल्याने जनजीवन सुरळीत आहे. अन्यत्र लॉकडाऊन काळात नागरिकांच्या घरात किंवा एमआयडीसी भागात विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यास जनजीवन विस्कळीत होईल. जिल्ह्यासह राज्यातील विद्युत महामंडळ म्हणजेच महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपनीतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यामुळे पोलीस आणि आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांप्रमाणे फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देण्यात यावा. तसेच अत्यावश्यक सेवा म्हणून अधिकृत घोषित करण्यात यावे, अशी मागणी विद्युत महामंडळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी या कर्मचाऱ्यांनी राज्यभर कामबंद आंदोलन न करता काळ्या फिती लावून राज्य शासनावर नाराजी व्यक्त केली.
फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन प्राधान्याने लसीकरण करावे -
वीज कर्मचारी, अभियंता, अधिकारी संघटना संयुक्त कृती समितीच्या पदाधिकारी यांची 15 मे रोजी ऑनलाइन बैठक झाली. बैठकीत सर्व वीज कर्मचारी व अधिकाऱ्यांनी एकच मागणी केली. राज्य शासनाने वीज कामगार, अभियंते व अधिकारी, कंत्राटी कामगार यांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा द्यावा आणि प्राधान्याने सर्वांचे लसीकरण करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यापूर्वीही अशी मागणी राज्य शासनाकडे पत्राद्वारे करण्यात आली होती. मात्र, सरकार आणि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने राज्यातील 400 वीज कामगारांचे कोरोना आजाराने मृत्यू झाले आहेत. यामुळे सर्व वीज कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यानं आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देऊन त्यांचे लसीकरण करावे, अशी मागणी सोलापूर विभागातील विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या वतीने करण्यात आली.
हेही वाचा - COVAXIN च्या २ ते १८ वयोगटातील चाचण्या जूनमध्ये, जुलै-सप्टेंबरपर्यंत मिळणार परवानगी
कोरोनाने मृत्यू झाल्यास फक्त 30 लाख रुपयांची नुकसानभरपाई -
कोरोनाच्या या महासंकटात पोलीस प्रशासनातील, आरोग्य विभागातील कर्मचारी किंवा अधिकारी कोरोना विषाणूची लागण होऊन मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना 50 लाखांचे अनुदान मिळते. मात्र, वीज महावितरण, महापारेषण किंवा महानिर्मिती यामधील एखादा कर्मचारी किंवा अधिकारी कोरोना विषाणूची लागण होऊन मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना फक्त 30 लाख रुपये अनुदान मिळते. हे अनुदान वाढवून मृत वीज कर्मचाऱ्यांच्या वारसांनाही 50 लाखांचे अनुदान द्यावे, अशी मागणी केली जात आहे. याबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांकडे यापूर्वी मागणी करण्यात आली होती. मात्र, ती आजपर्यंतही मान्य केली गेली नाही.
'या' संघटनांनी काळ्या फिती लावून कामकाज केले -
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील महावितरण, महापारेषण, महानिर्मिती यात काम करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांनी आज सोमवारी राज्य शासनावर नाराजी व्यक्त करत काळ्या फिती लावून कामकाज केले. यामध्ये विद्युय क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, सबओर्डीनेट इंजिनियर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस या संघटनांनी सहभाग घेतला होता.
हेही वाचा - संकटकाळात वीज कर्मचारी आघाडीवर, त्यांना तात्काळ फ्रंटलाईन वर्कर म्हणून जाहीर करा - बावनकुळे